‘मी ४.३० पर्यंत पोहोचतोय, जरा जेवणं तयार ठेव. खूप भूक लागलीये,’ असेच काहीसे शब्द बोलून समीर जाधव यांनी फोन ठेवला. त्यांची बायको तयारीला लागली. पण यानंतर पुन्हा त्या दोघांचं बोलणं होऊच शकलं नाही. दिंडोशी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल असणाऱ्या समीर जाधव यांचा मृत्यू झाला. एका अजाणत्या क्षणी मांजाने त्यांचा गळा चिरला आणि गंभीर जखमी झालेल्या समीर जाधव यांचा जीव गेला.
४.३० पर्यंत येतो सांगून त्यांनी फोन ठेवला खरा, पण अजून आले कसे नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नीला काळजी वाटत होती. काय करावं सूचत नव्हतं. दत्त जयंतीसाठी समीर जाधव हे आपल्या बायको आणि जुळ्या मुलांसोबत गावी जाणार होते. मंडणगडला दत्त जयंतीला जायची तयारी पूर्ण झाली होती. तिकीटंही रेडी होती. पण असं काही होईल, अशी पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती.
समीर यांची पत्नी अमृता, त्यांची ८ वर्षांची मुलगी स्वरा आणि दोन जुळे बहीण भाऊ स्वरा आणि अर्णव यांच्यासमोर नियतीने क्रूर खेळ केलाय. एका मांजाने जाधव कुटुंबाच्या काळजाचे तुकडे केलेत.