ताज्याघडामोडी

कोरोना बाधितांना एक वर्षांनंतरही जाणवत आहेत साईड इफेक्ट

कोरोना झाल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम दीर्घकाळ राहत असून अनेकांना एका वर्षानंतरही ते जाणवत असल्याचं अभ्यासात म्हणण्यात आलं आहे.

आतापर्यंतचा सर्वात जास्त सँपल साईज असणारा हा सर्व्हे असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकारचा ‘लॉँग कोव्हिड’ निम्म्या कोरोना रुग्णांना जाणवत असल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा एक वर्ष अभ्यास करण्यात आला. वुहानच्या हॉस्पिटलमधील 1276 रुग्णांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. 7 जानेवारी ते 29 मे 2020 या कालावधीत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

1276 रुग्णांपैकी 479 रुग्ण हे कोरोनातून बरे झाल्यानंतर आपल्या मूळ कामावर परत गेले. तर सुमारे 49 टक्के रुग्णांना किमान एक तरी लक्षण अजूनही जाणवत असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं आहे. चिंतेत वाढ बरे झाल्यानंतर 6 महिन्यांनी असणाऱ्या स्ट्रेस लेव्हलपेक्षा 1 वर्षानंतरची स्ट्रेस लेव्हल अधिक असल्याचं दिसून आलं आहे. यामागच्या कारणांचा सध्या शोध घेतला जात आहे.

इतर रुग्णांशी तुलना कोरोना व्यतिरिक्त इतर आजार झालेले रुग्ण आणि कोरोना रुग्ण यांचा तौलनिक अभ्यासदेखील यात करण्यात आला आहे. त्यातील निष्कर्षांनुसार कोरोना रुग्णांची तब्येत ही इतर आजारातील रुग्णांपेक्षा अधिक खालावलेली असल्याचं दिसून आलं. कोरोना रुग्णांची सर्वसाधारण प्रकृती अधिक कमकुवत झाल्याचं दिसून आलं. इतर आजारातील रुग्णांच्या तुलनेत कोरोना रुग्णांमध्ये अँग्झायटी, डिप्रेशन, डिस्कंफर्ट यासारख्या मानसिक समस्याही अधिक असल्याचं दिसून आलं.

महिलांना अधिक त्रास पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरावर कोरोनाचे अधिक दूरगामी परिणाम झाल्याचं दिसून आलं. महिलांना जाणवणारे शारीरिक आणि मानसिक त्रास हे पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं. थकवा आणि स्नायू कमजोर होण्याचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असल्याचं जाणवलं. जे गंभीर आजारी होते, त्यांना अद्यापही श्वसनाचा त्रास होत असल्याचं जाणवलं. लॉँग कोव्हिड हे एक वेगळं आव्हान असल्याचं मत या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *