गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नाकाबंदी सुरु असताना गाडी थांबवली, वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण, धक्कादायक घटना

नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलिसांनी या सनकी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आहे. राहुल रोकडे असं तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु आहे.या दरम्यान आज (13 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. तिथे विना हेल्मेट चालकांविरोधात कारवाई सुरु होती. यावेळी राहुल रोकडे हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता. पटाईत यांनी त्याची गाडी थांबवली. मात्र राहुल कट मारत तिथून निघून गेला.

राहुल काही अंतरावर गाडी लावून परत आला. त्याने पटाईत यांच्याशी हुज्जत घालत त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात पटाईत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी राहुल रोकडे याला ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *