ताज्याघडामोडी

शाळा सुरु करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. 

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं  जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत. 

कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे. 

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांत देखील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतील. 

महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी खास समिती गठित केली जाईल. समिती शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल. यामध्ये महापालिका आयुक्त हे अध्यक्ष असतील नगरपंचायत, नगरपालिका ग्रामपंचायत, स्तरावर सुद्धा समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील. 

शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित कराव्यात.

शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळा भरवण्यात यावी. 

एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. 

कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्ड वॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे.

जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रात भरवण्यात याव्यात.

प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासापेक्षा अधिक नसावा. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी सुद्धा नसेल.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी शाळेच्या परिसरात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. 

सोबतच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय प्रशासनाकडून केली जावी. 

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत्व पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *