ताज्याघडामोडी

संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साधेपणाने साजरा करणार – नामदास

पंढरपूर, प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 671 वा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार दि. 6 ऑगस्ट रोजी असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा सोहळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास यांनी दिली.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीसंत नामदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुुकुंद महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. यासाठी ह.भ.प. विठ्ठल महाराज, हरि महाराज, एकनाथ महाराज, मुरारी महाराज, केदार महाराज यांच्यासह नामदास परिवार परिश्रम घेत आहे.

पंढरपूर शहरात सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे व शासकीय नियमांचे पालन करीत ह,भ,प, नामदास महाराज परिवार व त्यांच्या फडा वरील ठराविक वारकरी भक्तासह हा सोहळा साजरा होणार आहे. तरी वारकरी, भाविक व समाज बांधवांनी मंदिरात दर्शनासाठी व महाप्रसादासाठी येवू नये तसेच गर्दी करू नये. प्रत्येकांनी आपल्या घरीच धार्मिक कार्यक्रम, पूजा व नैवेद्य करून समाधी सोहळा साजरा करण्याचे आवाहन नामदास महाराज परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. 6 रोजी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. नामदास महाराज यांचे किर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, पुजा, आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर शिंपी समाजाच्यावतीने श्री विठ्ठल मंदिर, संत नामदेव पायरी येथे महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. शनिवार दि. 7 रोजी संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त किर्तन, क्षीरापत व रविवार दि. 8 रोजी दुपारी काल्याचे किर्तन व सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होणार आहे.
समाज बांधवांनी समाधी सोहळा घरीच साजरा करावा – उंडाळे

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सर्व समाज बांधवांना घरपोहोच प्रसाद दिला जाणार आहे. तरी सर्वांनी आपल्या घरीच पूजा, आरती व प्रसाद करावा असे समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव विलास पोरे, खजिनदार शशिकांत जवंजाळ, विश्‍वस्त राजेश धोकटे (सर), बाबासाहेब महिंद्रकर, संजय चांडोले, महेश गानमोटे, अनंता पतंगे (म्हेत्रे), युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *