ताज्याघडामोडी

संजय राऊतांच्या घरी ईडी

बंगल्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात

आज सकाळी सात वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक संजय राऊत यांच्या भांडूप परिसरातील मैत्री बंगल्यावर धडकले. यावेळी ईडीच्या पथकासोबत सीआरपीएफचा कडेकोट बंदोबस्त होता. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या या पथकात १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काही अधिकारी संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तर उर्वरित अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी केली जात आहे. ईडीची आतापर्यंतची कार्यपद्धती पाहता संजय राऊत यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर आता भांडूप परिसरात त्यांच्या बंगल्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरी नक्की का धाड टाकली, हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, संजय राऊत सहकार्य करत नसल्याने त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने अशाचप्रकारे धाड टाकली होती. त्यानंतर ईडीने नवाब मलिक यांना आपल्या कार्यालयात नेऊन अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *