

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील आषाढी यात्रा सोहळ्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.देहू आळंदी आदी ठिकाणाहून पंढपुरकडे एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान करणाऱ्या मनाच्या प्रमुख १० दिंडी सोहळ्यांना ४० भाविकांसह पंढरपूरकडे पायी दिंडी नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती.या मागणीसाठी प्रशासन आणि दिंडी चालक यांच्यात अनेकवेळा बैठक झाली पण प्रशासन माघार घेण्यास तयार नव्हते.तर वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू हभप बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले होते.या घटनाक्रमानंतरही प्रशासन ठाम राहिले आणि आज अखेर एसटी बसने पालखी दिंडी सोहळे वाखरी मुक्कामी दाखल झाले.मात्र महाराष्ट्र सरकारच्या या आदेशा विरोधात संत नामदेव संस्थानने सुप्रीम कोर्टात दाद मागत महत्वाचे समजले जाणारे पालखी दिंडी सोहळे पायी पंढपुरात जाण्यास परवानगी द्या व आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
त्याची सुनावणी आज पार पडली असून सरन्यायाधीश एन.व्ही. रमना, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने हि याचिका फेटाळून लावताना देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाची सद्य स्थिती लक्षात घेता आपण या बाबत याचिका कर्त्याची मागणी मान्य करणारा निर्णय देण्याबाबत असमर्थतता दर्शविली आहे.त्यामुळे हा वाद आता न्यायालयीन पातळीवर तरी निकालात निघाला आहे.