ताज्याघडामोडी

राफेल व्यवहारात मध्यस्थाला कोट्यवधींची दलाली; कॉंग्रेसचा दावा

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या सौद्यात मध्यस्थाला कोट्यवधी रुपयांची दलाली दिली गेली असल्याचे पुरावे फ्रान्सच्या कोर्टापुढे आले आहेत असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, हिंमत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या या विषयीच्या प्रश्‍नांना सामोरे गेले पाहिजे.ते म्हणाले की, राफेलचा सौदा हा दोन देशांतील सरकारांमध्ये झालेला सौदा आहे असे मोदी सरकार सातत्याने सांगत आहे. पण मग जर फ्रान्स सरकारलाच जर या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय येत असेल आणि ते त्याची स्वतंत्र न्यायाधीश नेमून चौकशी करणार असतील तर भारतातही या व्यवहाराची चौकशी केली गेली पाहिजे.

ज्या देशातील करदात्यांचा पैसा विमानांच्या खरेदीसाठी वापरला गेला आहे आणि त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे त्या भारतात या प्रकरणाची चौकशी का टाळली जात आहे असा सवालही त्यांनी केला आहे.भ्रष्टाचाराची माहिती कागदपत्रांच्या आधारेच फ्रांसमध्ये सादर झाली असल्याने यात नेमके काय झाले आहे हे एक उघड गुपित बनले आहे असा दावाहीं त्यांनी केला. राफेल गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीश नियुक्‍त करण्याचा निर्णय फ्रान्सने घोषित केल्यानंतर त्यावर केंद्र सरकारने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया का नोंदवली नाही असा सवालही खेरा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *