ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचा माहिती अधिकार अर्ज देणाऱ्यावर गोळीबार

माहिती अधिकार कायदा २००५ अस्तित्वात आल्यानंतरच या कायद्याबाबत अनेक मतमतांतरे व्यक्त होत गेली.जेव्हा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून मागण्यात आलेल्या माहितीमध्ये भ्रष्टाचार लपलेला असतो तेव्हा माहिती देण्यास टाळाटाळ करणे किंवा ज्याने माहिती मागितली आहे त्याच्या विरोधात अनिष्ट घडामोडी करणे,अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणणे असे प्रकार महाराष्ट्रात सर्रास घडताना दिसून येतात.यातून अनेकदा अर्जदारावर जीवघेणे हल्ले झाले आहेत तर खंडणीसारख्या खोट्या केसेस मध्ये गुंतविण्याचा प्रयत्न देखील झाला आहे.तर अनेकवेळा माहिती अधिकार अर्जाचा वापर करीत संबंधित अधिकारी,पदाधिकारी याना वेठीस धरून,भ्रष्टाचार बाहेर काढण्याची भीती दाखवत पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीत देखील तथ्य असल्याचे निदर्शनास आले आहे.मात्र जर मागितलेल्या माहितीमध्ये काहीच अंगलट येण्यासारखे नसेल तर नक्की भीतीची कशाची बाळगली जाते हा प्रश्न मात्र कायम आहे.अशाच प्रकारच्या वादातून बार्शी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले यानी थेट गोळीबार केल्याची फिर्याद दाखल झाली आहे.                    

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैरागमधील जोतिबाचीवाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिल डिसले असे गोळीबार करणाऱ्या सभापतीचे नाव आहे. तर प्रमोद ढेंगळेवर असे आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरटीआय कार्यकर्ते प्रमोद ढेंगळे जोतिबाचीवाडी बस्थानकावरून आपल्या घरी रस्त्यावरुन जात होते. तेव्हा वाटेत त्यांना सभापती अनिल डिसले यांनी हाक देऊन भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर अनिल डिसले यांनी प्रमोद यांच्या डोक्यावर रिव्हॉलवर ठेवून अश्लिल शिवीगाळ सुरू केली. यावेळी ​यांच्यात लहू डिसले या व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, वाद काही थांबला नाही. त्यामुळे घटनास्थळावरून प्रमोद आणि एक स्थानिक लहू डिसले यांनी पळ काढला असता अनिल डिसलेने गोळीबार केला. प्रमोद ढेंगळे आपल्या घरात जाऊन लपले. त्यानंतरही आरोपीने घरासमोर येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

आरटीआय कार्यकर्ते प्रमोद ढेंगळे यांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवली होती, या वादातूनच गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *