नवी दिल्ली: पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या जागी एक वेगळे आणि स्वस्त इंधन उपयोगात आणण्याचा विचार सध्या केला जात आहे. हे इंधन म्हणजे इथेनॉल. सरकार येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये फ्लेक्स फ्यूएल इंजिनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हे इंजिन ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अनिवार्य केले जाणार आहे.फ्लेक्स फ्यूएल म्हणजे फ्लेक्सिबल फ्यूएल, म्हणजे असे इंधन जे पेट्रोलची जागा घेईल, म्हणजेच इथेनॉल. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की या नव्या इंधनाची किंमत 60-62 रुपये प्रति लीटर असणार आहे तर पेट्रोलची सध्याची किंमत 100 रुपये प्रति लीटरपेक्षाही जास्त आहे. यामुळे 30-35 रुपये प्रति लीटरची बचत होणार आहे.
फ्लेक्स फ्यूएल इंजिन होणार बंधनकारक
एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, “मी परिवहन मंत्री आहे, मी इंडस्ट्रीला एक आदेश देणार आहे की फक्त पेट्रोल इंजिने असणार नाहीत, फ्लेक्स फ्यूएल इंजिनही असतील, जिथे लोकांकडे पर्याय असेल की ते 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर करू शकतील.” त्यांनी सांगितले की येत्या 8 ते 10 दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे आणि फ्लेक्स फ्यूएल इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य केले जाणार आहे.
अनेक देश तयार करतात फ्लेक्स फ्यूएल इंजिन
नितीन गडकरी यांनी सांगितले की ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स फ्यूएल इंधनाचे उत्पादन करत आहेत या देशांमध्ये ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायोइथेनॉल वापरण्याचा पर्याय दिला जात आहे. ते म्हणाले की सध्या प्रति लीटर पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते जे प्रमाण 2014 साली 1 ते 1.5 टक्के होते. इथेनॉलची खरेदीही 38 कोटी लीटरपासून वाढून 320 कोटी लीटरपर्यंत पोहोचली आहे.
पेट्रोलपेक्षा कित्येक पटींनी चांगले इथेनॉल इंधन
गडकरी यांनी सांगितले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा कित्येक पटींनी चांगले इंधन आहे आणि यामुळे प्रदूषण होत नाही, तसेच ते स्वदेशी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलाही यामुळे चालना मिळणार आहे, कारण आपल्याकडील अतिरिक्त खाद्यान्न आणि उसाचा रस वापरून इथेनॉलचा ज्यूस तयार केला जाऊ शकतो. नुकतेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी पेट्रोलसह 20 टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी 2025चे लक्ष्य दिले होते. सरकारने गेल्यावर्षी 2022पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल ब्लेंडिग तर 2030पर्यंत 20 टक्के ब्लेंडिंग करण्याचे लक्ष्य ठेवले होते.