ताज्याघडामोडी

सर्व खासगी क्‍लासेस 21 जूनपासून सुरू होणार?

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पॉझिटिव्हिटी दराचे निकष लक्षात घेता राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यांत 50 टक्‍के उपस्थितीसह सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र, सरसकट राज्यभरात खासगी क्‍लासेस सुरू न झाल्याने त्यांची आर्थिक परवड होत आहे.

त्यामुळे आरोग्याचे सर्व नियम पाळून 21 जूनपासून महाराष्ट्रातील सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य खासगी क्‍लासेस कृती समितीने घेतला आहे.

राज्यातील विविध भागांतील सहा संघटना एकत्रित येत ‘महाराष्ट्र कोचिंग क्‍लासेस कृती समिती’ची स्थापन केली. या समितीने मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत खासगी क्‍लासेस बंद असल्याने क्‍लासेससमोर निर्माण झालेल्या अनेक अडचणी मांडल्या.

यावेळी समितीचे विजय पवार, सतीश देशमुख, दिलीप मेहेंदळे, रजनीकांत बोंद्रे, संतोष वासकरसह आदी उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली 14 महिने राज्यातील जवळपास 1 लाख खासगी कोचिंग क्‍लासेस संपूर्णत: बंद आहेत. त्यातील पुण्यातील 17 हजार क्‍लासेसचा समावेश आहे. सुमारे 40 टक्‍के शिक्षकांनी क्‍लासेसचे क्षेत्र सोडून दिले आहेत. तसेच, क्‍लासेसचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन खर्च, लाईट व पाणी बिल यांचे आर्थिक ओझे यामुळे पुरता खचला आहे, याकडे समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले.

क्‍लासेस कृती समितीच्या मागण्या

-खासगी क्‍लासेसना शासनाने पॅकेज जाहीर करावे

-सर्व प्रकारचे कर माफ करा

-क्‍लासेससाठी जीएसटीची मर्यादा कमी करावी

-परीक्षा मंडळात क्‍लासेस प्रतिनिधींचा समावेश करावा

-क्‍लासेससाठी ‘चेंबर ऑफ क्‍लासेस’ सुरू करावी

-क्‍लासेस चालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *