गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रॅक्टर, वाहने चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश

पुणे, 25 मे : पुणे ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमधूनही त्यांनी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 ट्रॅक्टरसह 14 चारचाकी, 6 बाईक, गाई आणि चोरीसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यांनी केलेल्या 21 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे.

पुण्याच्या विविध तालुक्यांमध्ये वाहने चोरीला जाण्याच्या तक्रारींमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली होती.

त्यामुळं पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर एक खास पथक तयार करून याच्या तपासासाठी रवाना करण्यात आलं. दरम्यानच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेला एक गोपनीय माहिती मिळाली. यात शिरूर शहरातील तीन इसमांबाबत माहिती देण्यात आली.

शिरूर शहरात राहणारे सतीश राक्षे, विनायक नाचबोणे आणि प्रवीण कोरडे यांच्याबद्दल पोलिसांना टीप मिळाली होती. हे तिघेही एकत्र असतात आणि काहीही काम धंदा करत नाहीत. मात्र त्यांच्याकडे ट्रॅक्टर, पिकअप अशा वेगवेगळ्या गाड्या दिसतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळं पोलिसांना या तिघांवर संशय होता. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळवत या तिघांवर कारवाई केली. सतीश याला शिरूरच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नाचबोणे आणि कोरडे यांच्यासह त्यांच्या आणखी काही साथीदारांनाही अटक केली.

पोलिसांनी यांच्याकडून चोरी केलेला तब्बल 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो, 1 स्कॉर्पिओ यासह 6 बाईक, 5 गायी असा मुद्देमाल जप्त केला. तसंच गॅस कटर, घरगुती गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, नट बोल्ट उघडण्याचे पान्हे जप्त केले आहेत. या सर्वांनी केलेले तब्बल 21 गुन्हे समोर आले आहेत. तब्बल 77 लाखांची चोरीची वाहनं त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. ही टोळी शिरूर, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, बार्शी या तालुक्यातील शेतकऱ्यांची वाहनं चोरून नंतर ती चोर बाजारात विकायची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *