नांदेड, 19 मे: नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली.
याप्रकरणी मृत रुग्णाच्या पत्नीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर संबंधित रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटल तसंच येथील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणे, उपचारात निष्काळजीपणा करणे, अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.
पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मुजामपेठ येथील रहिवासी असणाऱ्या अंकलेश पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अंकलेश यांना 16 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकानी गोदावरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 19 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. दुसरीकडे, नातेवाईकांकडून पैशांसाठी डॉक्टरांचा तगादा सुरूच होता. 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यानच्या तीन दिवसांत डॉक्टरांनी फिर्यादी शुभांगी पवार यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले.
तर, 24 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. यानंतर दोन दिवसांनी फिर्यादी शुभांगी पवार यांनी आपल्या नवऱ्याचं मृत्यूचं प्रमाणपत्र पाहिलं. तेव्हा संबंधित प्रमाणपत्रावर 21 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद त्यांना आढळली. यामुळे फिर्यादी शुभांगी पवार पुन्हा गोदावरी हॉस्पिटलमध्ये गेल्या. आपल्या पतीवर काय उपचार केले याबाबतचा तपशील त्यांनी मागितला. पण डॉक्टरांनी पुन्हा 40 हजार रुपयांची मागणी केली. याशिवाय तपशील मिळणार नसल्याचं सांगत त्यांना परत पाठवलं, असं शुभांगी पवार यांनी सांगितलं.
21 एप्रिल रोजी मृत्यू झाला असताना देखील, गोदावरी रुग्णालयानं संबंधित रुग्णावर 24 एप्रिल पर्यंत उपचार केले. शिवाय उपचाराच्या नावाखाली विविध औषधं मागवली. एवढंचं नव्हे तर आरोपी डॉक्टरांनी शासनाच्या ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा अधिकचे पैसे घेतले, असे आरोप करत शुभांगी पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. नांदेडच्या सत्र न्यायालयानं त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गोदावरी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.