देशभरात कोरोना बाबत जशी चर्चा होत आहे तशीच चर्चा कोरोना चाचणीच्या विश्वासाहर्ते बाबतही होत आली आहे.गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि आरटीपीसीआर हा एकमेव चाचणीचा पर्याय ठरला.आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने अँटीजेन चाचणीचा पर्याय पुढे आला.पण अँटीजेन चाचणीच्या विश्वासाहर्ते बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.असाच अनुभव पंढरपुर तालुक्यातील एका इसमास आला असून १७ मे रोजी मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला तर १९ मे रोजी पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या घटनेमुळे पंढरपुर तालुक्यातील मनसेचा पदाधिकारी असलेल्या त्या व्यक्तीची मात्र मोठी गोची झाली आहे. सदर व्यक्तीस यापूर्वी कोरोना होऊन गेलेला आहे.व सध्या त्यास कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.मात्र उपजिल्हा रुग्णालया सारख्या ठिकाणी करण्यात आलेल्या चाचणीत अशा प्रकारे तफावत आढळून येत असेल तर हि बाब गंभीर मानली जात आहे.
कोरोना साठी करण्यात येणाऱ्या अँटीजेन चाचणी बाबत तज्ञ् व्यक्तीकडून अधिक माहिती घेतली असता अँटीजेन टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तो रुग्ण नक्कीच पॉझिटिव्ह असतो मात्र निगेटिव्ह रिपोर्ट येण्यामागे अनेक तांत्रिक कारणे आहेत.टेस्टसाठी स्वाब घेताना त्या व्यक्तीच्या हालचालीमुळे नाकात योग्य ठिकाणी टेस्टिंग स्टिकचा स्पर्श न होणे हे त्यातील महत्वाचे कारण आहे.आणि जरी अँटीजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी आरटीपीसीआर करून घेणे केव्हाही हितावह आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.