गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! विहिरीत कालवले विष, पिण्याच्या पाण्यातही ओतले कीटकनाशक, गुन्हा दाखल

शहापूर तालुक्याच्या मुसईवाडीतील पिण्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तींनी कीटकनाशक टाकून पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून किन्हवली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या व्यक्तींचा शोध घेत असून विचित्र घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

शहापूरच्या ग्रामीण भागात आदिवासी वाड्यातील जनतेला एकीकडे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात मुसईवाडीतील एका विहिरीत कीटकनाशक टाकल्याने खळबळ उडाली आहे. मुसईवाडीतील आदिवासींसाठी येथे एकमेव शिवकालीन विहीर आहे. या विहिरीवर सकाळी महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या असता त्यांना विहिरीतील पाण्याला उग्र वास आला.

हे पाणी दूषित झाल्याचे समजताच महिला घाबरल्या. या भागातील कोणीतरी विहिरीत विषारी औषध टाकल्याचे वेळीच लक्षात आल्याने विष प्रयोगाची घटना सुदैवाने टळली.

घाबरलेल्या महिलांनी याबाबत ग्रामस्थांना सूचित करताच सरपंच आंबो पारधी, उपसरपंच अपर्णा कुडव, ग्रामसेविका टी. एन. बल्लाल व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सदर विहीर व पाण्याची पाहणी करून याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात किन्हवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दूषित पाण्याचा उपसा

ही घटना समजताच विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा व विहिरीची साफसफाई त्वरित करण्यात आली आहे. हे कृत्य करणाऱ्या अज्ञातांचा शोध घेणे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *