ताज्याघडामोडी

केजरीवाल सरकारची मोठी घोषणा; कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. काही रुग्णांना दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

जर कुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. तसेच, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांना कोरोनामध्ये गमावलेल्या व्यक्तींना, विशेषत: पालक गमावलेल्या मुलांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संवाद साधला. त्यांनी यावेळी वरील घोषणा केली. कोरोनामुळे सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. त्याचबरोबर ज्या कुटुंबांमध्ये कमावत्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्या कुटुंबाला ५० हजार रुपये मदतनिधीसोबतच महिना २५०० रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातील. यामध्ये जर पतीचे निधन झाले असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. जर पत्नीचे निधन झालं असेल, तर पेन्शन पतीला मिळेल. जर एखाद्या अविवाहित व्यक्तीचे निधन झालं तर ही पेन्शन पालकांना मिळेल, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केले. त्याचबरोबर एका पालकाचे आधीच निधन झालेले असताना दुसऱ्या पालकाचं कोरोनामुळे निधन झाल्यास अशा विद्यार्थ्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. दिल्ली सरकारकडून अशा विद्यार्थ्यांना वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत २५०० रुपये प्रतिमहिना पेन्शन स्वरूपात दिले जातील. यासोबतच, त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च दिल्ली सरकारकडू केला जाईल, असे देखील केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *