ताज्याघडामोडी

कोरोनाच्या संकटकाळात केंद्राने वाढवल्या रासायनिक खतांच्या किंमती

मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटकाळात रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे वाढवलेले खतांचे दर कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे.

शेतीची कामे जरी गेल्या दीड वर्षापासून सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्यामुळे त्याचा फटका बहुतेक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत ज्या पद्धतीने वाढ झाली आहे, ती अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही.

700 ते 800 रुपयांची वाढ बऱ्याच खतांच्या किंमतीत झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीनं मागे घ्यावी, अशी विनंती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी आपण सातत्याने पाठपूरवठा करु आणि केंद्र सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला लावू असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

इफ्को 10:26:26 चा जुना दर हा 1175 रुपये एवढा होता, तो आता 1775 रुपये एवढा झाला आहे. इफ्को 10:32:16 चा जुना दर हा 1190 एवढा होता, आता तो 1800 रुपये एवढा झाला आहे. इफ्को 20:20:00 चा जुना दर हा 975 रुपये एवढा होता, तो आता वाढून 1350 रुपये एवढा झाला आहे. डीएपी खताचा जुना दर हा 1875 रुपये एवढा होता, तो आता 1900 रुपये एवढा झाला आहे. आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत 1200 रुपये होती, ती आता 1900 रुपये एवढी झाली आहे. आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही 975 रुपये एवढी होती, ती आता 1400 रुपये एवढी झाली आहे. पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी 850 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *