यवतमाळ, 11 मे: येथील एका वधुनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयातून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी वधुनं आपला भाऊ आणि मैत्रिणीच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयामध्ये विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुदैवानं 10 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर वरानं मृत्यूवर विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यानं रुग्णालयातून बरं होताचं, थेट पोलीस स्टेशन गाठून भावी वधुविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना उघड होताचं परिसरात खळबळ उडाली आहे.
घातपातातून बचावलेल्या संबंधित 23 वर्षीय वराचं नाव किशोर परसराम राठोड असून तो नेर तालुक्यातील कोहळा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील एका तरुणीशी ठरला होता. लग्नाची तारीखही पक्की करण्यात आली होती. लग्नाची तारीख जवळची निघाल्यानं दोन्ही कुटुंबीयांत आनंदाचं वातावरण होतं. धामधूमीत लग्नाची तयारी सुरू होती. पण होणाऱ्या नवरीच्या मनात काहीतरी विपरीतचं होतं.
आरोपी वधूनं गेल्या शनिवारी (1 मे रोजी) आपल्या होणाऱ्या नवऱ्याला नेर याठिकाणी बोलावून घेतलं. यावेळी आरोपी वधूसोबत तिचा भाऊ आणि अन्य एक मैत्रिण देखील होती. दरम्यान आरोपी वधूनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला हट्ट करत माळीपुरा येथील कोल्डड्रिंक्सच्या दुकानात नेलं. याठिकाणी सर्वांनी किशोरला शीतपेय पिण्याचा आग्रह केला. यावेळी गप्पा मारत असताना किशोरचं लक्ष विचलित करून त्याच्या शीतपेयात काही तरी टाकण्यात आलं. तसेच नात्याची शपथ घालून त्याला संबंधित विषयुक्त शीतपेय प्यायला भाग पाडलं. तसेच उरलेलं शीतपेय आरोपी वधूनं आपल्या बॅगेत ठेवलं.
वृत्तानुसार, शीतपेय पिल्यानंतर किशोर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. दरम्यान घरी जात असताना, किशोरला वाटेतचं चक्कर आली आणि तो खाली कोसळला.मित्राला चक्कर आल्याच पाहुन मित्रानं किशोरला लगेचच जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगत डॉक्टरांनी रुग्णाला यवतमाळ याठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. यवतमाळ याठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना. त्याच्यावर विषप्रयोग केला असल्याची माहिती डॉक्टरांनी किशोरला दिली.
त्यामुळे किशोरला त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार लक्षात आला. मृत्यूला हरवल्यानंतर पीडित किशोरनं थेट पोलीस स्टेशन गाठून आपल्या होणाऱ्या पत्नीसोबतच अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.