ताज्याघडामोडी

राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊनची शक्‍यता; काही बाबी शिथिलही केल्या जाण्याचे संकेत

मुंबई, दि. 11 – राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस आणि अन्य आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले असून, ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्‍यता असली तरी त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, या बैठकीतच पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की, कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी लगेच पूर्ण लॉकडाऊन हटवला जाईल अशी अपेक्षा करू नका, असेही म्हटले आहे. सगळं लगेच शंभर टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असा आपला अंदाज आहे. पण पूर्ण लॉकडाऊन काढून शंभर टक्के मोकळीक होईल असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करत आहेत.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही एका वाहिनीशी बोलताना लॉकडाऊनसंबंधी भाष्य केले आहे. लॉकडाऊन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो, कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो, कोणते निर्बंध कडक करायचे याचा विचार करावा लागेल.

आपण अभ्यास करत असून सर्वांची मते घेत आहोत, त्यामुळेच यश मिळत आहे. टास्क फोर्स काय शिफारस करते, यासंबंधी कॅबिनेटमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *