कोरोना पॉझिटिव्ह असताना रक्तदान शिबीर घेऊन जंगी वाढदिवस साजरा करणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राकेश श्रीपाल कुरणे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हैसाळ तलाठी सुधाकर कृष्णा कुणके यांनी फिर्यादी दिली आहे.राकेश कुरणे हा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांनी घरी क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या होत्या.
परंतु तरी देखील क्वारंटाईन न होता. नातेवाईक व मित्रांसमवेत कुरणे याने जंगी वाढदिवसाची पार्टी केली. तसेच त्याने वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. वाढदिवसाला उपस्थित असलेल्यांना जेवणावळ देखील घालण्यात आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेकांनी कुरणे याला केक भरवून अलिंगन दिल्याचा देखील धक्कादायक प्रकार यावेळी घडला.
हा प्रकार घडत असताना कुरणे यांना समजावण्यासाठी गेलेल्या ग्राम दक्षता समितीला देखील त्याने अरेरावीची भाषा केली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकारानंतर वाढदिवसाला गेलेल्या सुमारे २०० ते ३०० जणांचे धाबे दणाणले असून गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असताना तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश असताना देखील विनापरवाना रक्तदान शिबीर घेऊन स्वतःचा वाढदिवस उत्साहात साजरा केल्याप्रकरणी राकेश कुरणे याच्या विरुद्ध तलाठी सुधाकर कुणके यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात कुरणे याच्या विरुद्ध साथीरोग प्रतिबंध कायदा तसेच महाराष्ट्र कोव्हिड अधिनियम २०२० कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मिरज तालुक्यातील विजयनगर येथे कोरोची पॉझिटिव्ह संशयीताने वाढदिवसानिमित्त घातलेली भोजनावळ व रक्तदान शिबिराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तालुका आरोग्य विभागाच्या यंत्रनेची तारांबळ उडाली आहे. प्रत्येक घरात जाऊन संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. मिरज तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे ३ हजार संशयित रुग्ण असून यापैकी सात ते आठ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रत्येक गावात आरोग्य यंत्रणा कार्यक्षम करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. पी. सावंत यांनी दिली.