ताज्याघडामोडी

सरकारच्या मूर्खपणामुळं आणि नालायकपणामुळं आरक्षण रद्द

बीड, 06 मे: राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याचा निकाल बुधवारी दिला. दरम्यान, ‘जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांमुळ मिळालं होतं, ते या आघाडी सरकारच्या मूर्खपणामुळं, नालायकपणामुळं आणि या सरकारने सर्वोच न्यायालयामध्ये योग्य बाजू न मांडल्यामुळं रद्द झालं आहे. हा मराठा समाजासाठी काळा दिवस आहे’, अशी सडकून टीका आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर केली आहे. आता मराठा तरुणांनीचं आंदोलन हातामध्ये घ्यावं, असं आवाहन देखील मेटेंनी जाहीर कार्यक्रमातून केलं आहे.

बुधवारी विनायक मेटे बीडमध्ये जिजाऊ कोव्हिड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘अन्नामध्ये मीठ कालवण्याचा प्रकार या सरकारने केला आहे. अशोकराव चव्हाण याचे सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणून अशोकराव चव्हाणांनी एक मिनिटं सुद्धा या पदावर राहता कामा नये. 42 बलिदान देऊन करोडो लोकांनी रस्त्यावर येऊन, जे मिळवलं. ते यांनी मातीत घालवलं. सगळ्यांचं जीवन उद्धवस्त करून हे मात्र मस्त एसीमध्ये बसून पैसे कमवायचे आणि बाकी सगळं गमवायच्या मागे लागले आहेत. म्हणून मराठा समाजाचा तळतळाट यांना लागल्याशिवाय राहणार नाही.यामुळं अशोक चव्हाणानी एक मिनिटं सुद्धा पदावर राहू नये’,  अशा कठोर शब्दात मेटेंनी टीका केली आहे.

दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं पाहिजे, असं आवाहन देखील विनायक मेटे यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. यामुळं मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तीन चार दशकाच्या लढ्यानंतर देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्या चुकीमुळे अपयश पदरी पडलं यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे तोरणाची परिस्थिती असताना मराठा समाजातील बांधवांनी नियम पाळून सरकारला त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे भविष्यातील पिढी आणि मुलांचे भवितव्य यासाठी पुन्हा एकदा आरक्षण लढा देणे गरजेचे आहे असे देखील विनायक मेटे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *