नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस 1 मेपासून भारताला मिळणार आहे. परंतु, या लशीचे किती डोस मिळणार आणि त्यांची किंमत किती याबाबत अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. या लशीच्या किंमत जागतिक पातळीवर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लशीच्या तुलनेत तब्बल पाचपटीने अधिक आहे.
याविषयी बोलताना रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) प्रमुख किरील दिमित्रिव म्हणाले की, रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीचे डोस 1 मेपासून भारताला मिळण्यास सुरवात होईल.
कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताला रशिया मदत करेल.
भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दैनंदिन मृत्यूचा आकडाही वाढत चालल्याने सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. त्यानुसार रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्यात आली होती.
स्पुटनिक व्ही लस 1 मेपासून भारताला मिळणार आहे. पण अद्याप लशीची भारतातील किंमत निश्चित जाहीर करण्यात आलेली नाही. इतर देशांमध्ये ही लस 10 डॉलर म्हणजेच सुमारे 750 रुपयांना दिली जाते. तर सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस केंद्र सरकारला केवळ दोन डॉलर म्हणजे 150 रुपयांनाच मिळते. नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये ही लस 200 रुपयांना तर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत देण्यात येते.
स्पुटनिक व कोविशिल्डची तुलना केल्यास किंमतीत पाचपटीने फरक आहे. दोन्ही लशींमधील किंमतीत मोठा फरक असल्याने रशियन डायरेक्ट इन्व्हेटमेंट फंड (आरडीआयएफ) कडून किंमतीत फारशी कपात केली जाणार नाही, असे दिसते. सिरमच्या बरोबरीने लशीची किंमत आणण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे लशीची किंमत ठरवताना केंद्र सरकारला मोठी तडजोड करावी लागू शकते.
आरडआएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव म्हणाले, कोविशिल्ड लशीच्या तुलनेत स्पुटनिक बाजारात खूप महाग आहे. सर्व देशांमध्ये स्पुटनिकची किंमत जवळपास सारखीच आहे. भारतासह आतापर्यंत 60 देशांनी या लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. उत्पादनाचा विचार केल्यास लशीची किंमत एवढी कमी होणे शक्य नाही. पण सरकार व खासगी बाजारातील किंमती वेगळ्या कऱण्याबाबत काही उपाय सुचविता येतील.