ताज्याघडामोडी

टेस्टींग, ट्रेसिंग व लसीकरणावर भर   मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे – तहसिलदार सुशिल बेल्हेकर

टेस्टींग, ट्रेसिंग व लसीकरणावर भर  

मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे – तहसिलदार सुशिल बेल्हेकर

                पंढरपूर. 03:-  तालुक्यातील  ग्रामीण भागात  गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात टेस्टींग, ट्रेसिंग व लसिकरणावर भर देण्यात येणार असून, या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन  तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.

              कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर तालुकास्तरीय समितीची बैठक आज  पंचायत समिती, शेतकी भवन पंढरपूर येथे घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉअरविंद गिराम, पोलीस निरिक्षक किरण अवचर, सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत पाटील व समिती सदस्य उपस्थित होते.

                  तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे..कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत नागरिकांचा शोध घेवून तपासणी करावी. विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनासोबत काम करुन नागरिकांमध्ये जनजागृती करावी. लसिकरण मोहिम अधिक गतिमान करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने  लसिकरण केंद्राची संख्या वाढवण्याबाबत नियोजन करावे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटरसाठी इमारती अधिगृहित करुन आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात,  अशा सूचनाही तहसिलदार बेल्हेकर यांनी यावेळी दिल्या.

        जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत अधिसूचना व निमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या मध्ये सार्वजनीक ठिकाणी नियमितपणे मास्कचा वापर करणे,  सार्वजनिक ठिकाणी न थुकणे, सामाजिक अंतराचे पालन करणे  आदी सूचनांचा समावेश असून नियमांचे व सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

                यावेळी ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *