गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 लाखांच्या बदल्यात 14 लाखांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकारांना अटक

दहा टक्के व्याज दराने कर्ज देऊन दोन लाखांच्या बदल्यात 14 लाख रुपयांची मागणी करू त्रास देणाऱ्या दोघा खाजगी सावकारांना पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

उमेश चंद्रकांत घारे ( राहणार सन सिटी सिंहगड रस्ता पुणे) आणि संदीप घारे (वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण रतिलाल बाफना (वारजे माळवादी) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी बाफना यांनी 2019 मध्ये आरोपींकडून दोन लाख रुपये घेतले होते. यावर आरोपी उमेश घारे याने दरमहा दहा टक्के व्याज दर आणि सिक्युरिटी म्हणून ब्लांक चेक, व महिंद्रा एक्स यु व्ही ही गाडी गहाण ठेवून घेतली होती.

दरम्यान कर्जाची मुद्दल व व्याज देण्यास उशीर झाल्याचे कारण सांगून आरोपी तक्रारदाराच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होते. घरातील साहित्याची मोडतोड करत होते. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेले फिर्यादी यांचा मित्र समाधान डावरे याची बुलेट दुचाकी देखील या अवैध सावकारांनी ओढून गेली होती.

दरम्यान हे दोन्ही आरोपी फिर्यादी यांच्याकडे दोन लाख रुपये मुद्दल, 24 महिन्याचे व्याज व दंड म्हणून 14 लाख रुपये रकमेची वारंवार मागणी करत होती. त्यांच्या त्रासाला कंटाळून वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्या वेळी पोलिसांनी दोघाही आरोपींना त्रास न देणे बाबत समज दिली होती. तरीही आरोपींनी त्रास देणे सुरूच ठेवले. त्यामुळे तक्रारदारांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने या दोन्ही सावकारांना अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या घरी टाकलेल्या छाप्यात सही केलेले चेक, सही केलेले कोरे मुद्रांक जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक वाहनांची कागदपत्रे, आधार कार्डचा प्रति मिळून आले आहेत. पोलिसांनी या दोन सावकार विरोधात गुन्हा दाखल केला असून या दोघांनी आणखी कुणाला अवैधरित्या कर्ज दिल्यास अथवा वसुलीबाबत कोणाची तक्रार असल्यास खंडणी विरोधी पथकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *