ताज्याघडामोडी

विना मास्क फिरणाऱ्यावर पंढरपूरमध्ये कारवाई  1 लाख 7 हजाराचा 500 रुपयाचा दंड वसुल,  नियमांचे पालन करण्याचे गजानन गुरव यांचे आवाहन

  पंढरपूर, दि. 21 :-  मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले. यामध्ये 19 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शहरात 215 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 7 हजार 500 रुपयांचा  दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी  गजानन गुरव यांनी दिली.

           गेल्या काही दिवसांत कोरोना बधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. माघीयात्रा यात्रा कालावधीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मठामध्ये नव्याने येणाऱ्या भाविकांना बंदी करण्यात आली आहे. पंढरीत भाविकांची गर्दी वाढू नये यासाठी  प्रशासनाकडून मठ, मंगल कार्यालय, 65 एकर परिसर, नदीपात्र या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात असल्याची माहिती श्री. गुरव यांनी दिली.

            यात्रा कालावधीत गर्दी होणार नाही याची  दक्षता संबधितांनी  घ्यावी तसेच  संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई  करण्यात येईल, असे आवाहनही  त्यांनी केले आहे.    

पोलीसांची त्रिस्तरीय नाकाबंदी

          पंढरीत माघ यात्रेच्या निमित्ताने भाविकांची  होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर समितीमार्फत 22 व 23 फेब्रुवारी 2021 रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरासह परिसरातील 10 गावांमध्ये 24 तासांची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इतर राज्यातून व  राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या दिंडीस व भाविकास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय नाकांबदी करण्यात आली आहे. बाहेरील भाविकांनी  मठात थांबू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे  आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. तसेच निर्भया पथक  व स्वेरी इंजिनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने भाविक व नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपरिषदेची  कारवाई :20 हजार 100 रुपये दंड वसूल

       पंढरपूर शहरात सह ग्रामीण भागात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लघंग करणाऱ्या  शहरातील दुकानदार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते आदी वर नगरपालिकेच्या वतीने 170 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 20 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

         कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नगरपरिष्रदेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदीर परिसर, प्रदिक्षिणामार्ग तसेच शहरातील आवश्यक ठिकाणचे  निर्जंतुकीरण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे  पालन करावे, विनामास्क घराबाहेर पडू नये असे आवाहनही श्री. मानोरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *