देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करू नये तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार साखर कारखान्यांनी दरमहा साखरेची विक्री स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा सर्व साखर कारखान्यांना दिला आहे.
देशांगर्तग अतिरिक्त झालेल्या साखरेच्या उत्पादनाचे व्यवस्थापन व्हावे, साखरेची किंमत देशांतर्गत बाजारपेठेत स्थिर व्हावी. तसेच, ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे कारखान्यांकडून दर मिळावा याकरिता केंद्र शासनाने शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत 3100 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.तसेच, बाजारातील साखरेची मागणी, पुरवठ्यातील समतोल साधण्याकरिता खुल्या बाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी यासाठीचा साखर विक्रीचा दरमहा कोटा कारखान्यांना ठरवून दिलेला आहे.
केंद्र शासनाच्या सर्व बाबींची अंमलबजावणी न करणे म्हणजे शासनाच्या साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या धोरणाचे उल्लंघन आहे. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यावी, या सूचनांचे साखर कारखान्यांनी पालन न केल्यास संबंधीत कारखान्यांवर कारवाई केली जाईल आणि याबाबतचा अहवाल केंद्र शासनास सादर केला जाणार आहे, असे साखर आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.