ताज्याघडामोडी

क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाच्या मृत्यू

सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart attack) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटील( वय 35) असं मयत तरुणांचे नाव आहे. मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका संघातून विकेट किपर म्हणून अतुल पाटील खेळत होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास सामना सुरू असताना त्यांनी एक बॉल अडवला असता अचानक ते मैदानावरच कोसळले.
अतुल पाटील मैदानावर कोसळल्यामुळे इतर खेळाडूंनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सारे अक्षरशः हादरले होते. या घटनेनं ढवळी गावावर शोककळा पसरली आहे.

अतुल पाटील हे औषध विक्रेते होते. त्याचबरोबर ढवळी गावचे ते उपसरपंच होते. तसंच अतुल पाटील हे खासदार संजय पाटील समर्थक होते आणि ढवळी गावचे माजी उपसरपंच होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते उमेदवार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे ढवळी गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशीरा ढवळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *