ताज्याघडामोडी

…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी

…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक

केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात राजधानी दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राज्यातही पडसाद उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करत या कायद्याला विरोध केला आहे.कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर माजी खासदार आणि संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ वातावरण तापलं होतं.”शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय वळण लावून जर परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही,” असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले.कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

यावेळी पुतळा दहन करण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांची अडवणूक करण्यात आली. मात्र आमची अडवणूक झाली असली तरी आमचा उद्देश आम्ही साध्य केलाय, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं “शेतकऱ्याला खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले”, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी अमित शहा यांच्यावर केली आहे.शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी जातीवादाचं ठेवणीतलं अस्त्र केंद्र सरकारनं बाहेर काढलं असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “लोकशाहीचे संकेत धाब्यावर बसून घाईघाईने केंद्र सरकारने कृषी विधेयकं मंजूर केली. शेतकऱ्यांची पसंती नसतानाही ही विधेयक मंजुर करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्या, उद्योजक यांच्या घशात शेती व्यवसाय घालण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. त्यामुळे शेती वाचवा आणि आम्हाला वाचवा अशी मागणी शेतकरी वर्ग करतो आहे. शेतकर्‍यांना सन्मानाने शेतीव्यवसाय करू देणं, हमीभावाचा कायदेशीर अधिकार शेतकऱ्यांना मिळायला हवा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *