ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील पवारप्रेमी भालके समर्थकांचे आता शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष 

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील पवारप्रेमी भालके समर्थकांचे आता शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

अंत्यविधीस उपस्थित अजितदादांच्या शब्दांनी विठ्ठल परिवारास व स्व.आ.भालके समर्थकांना दिलासा

   माजी केंद्रीय कृषी मंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि पंढरपूर तालुक्याचे स्नेहबंध अगदी शरद पवार हे 1978 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी कॉग्रेस पक्षात बंड करुन पहील्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अतिशय दृढ असून ज्यावेळी शरद पवार यांनी कॉग्रेसपासून वेगळे होत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा पंढरपूर तालुक्याच्या हरितक्रांतीचे जनक,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.औदुंबरअण्णा पाटील यांनी शरद पवार यांना सर्वात प्रथम पाठींबा जाहीर केला होता.तेव्हापासून पवार आणि पंढरपूरचा विठ्ठल कारखान्याचा सभासद,आण्णा गट यांचे नाते अतिशय घट्ट झाले होते.
    विठ्ठल कारखान्याशी निगडीत असलेला सभासद,शेतकरी यांच्यामध्ये कायम शरद पवार या नावाबद्दल प्रचंड आदराची,आपुलकीची भावना राहीली आहे.पुढे 1985 साली शरद पवार यांनी पुलोदची स्थापना करीत राज्यात विधानभेच्या निवडणूका चरखा या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हा सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या बळावर राजकारणात पदे मिळविलेल्या अनेकांनी शरद पवार यांची साथ सोडली होती.पण विठ्ठल कारखाना आणि त्याच्याशी निगडीत मतदारांनी शरद पवार हाच आपला पक्ष मानला होता.स्व.औदुंबर आण्णांनी पुलोदचा झेंडा हाती घेवून स्व.यशवंतभाऊ पाटील यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले होते.
         1991 च्या विधानभा निवडणुकीपुर्वी शरद पवार हे पुन्हा कॉग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर स्व.औदुंबरआण्णांकडे कॉगेे्रसचे जिल्हाध्यक्ष पद आले.91 च्या विधानसभा निवडणूकीसाठी स्व.आण्णांना शरद पवार हे न्याय देतील,उमेदवारी देतील असा विश्‍वास व्यक्त होत असतानाचा ऐनवेळी शरद पवार यांच्या शब्दाखातीर स्व.आण्णांनी माघार घेतली होती.पुढील विधानसभा निवडणुकीत स्व.आण्णांना संधी देवू असे आश्‍वासन शरद पवार यांनी दिल्याने तालुक्यात प्रबळ समजला जाणारा आण्णा गट शांत झाला होता.स्व.सुधाकरपंत परिचारक हे त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील सर्वात मताधिक्याचा विजय नोंदवून राज्यात चर्चेचा विषय झाले होते.
          पुढे 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कॉग्रेसकडून स्व.आण्णांना उमेदवारी मिळणारच शरद पवार हे यावेळी गेल्यावेळच्या विधानसभा निवडणूकीवेळी अर्ज माघारी घेण्याचा आग्रह करताना दिलेल्या आश्‍वासनावर ठाम राहतील आणि स्व.आण्णांना संधी देतील असा विश्‍वास अण्णा गटास वाटत असतानाच कॉग्रेसकडून स्व.सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी जाहीर झाली.आणि यावेळी मात्र पवारसाहेंबाचे देखील आम्ही ऐकणार नाही,आपल्यावर अन्याय झाला आहे,आपण मागील वेळी माघार घेतली आता नाही या स्व.आण्णा गटाच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी घेतलेल्या भुमिकेपुढे स्व.आण्णा देखील हतबल ठरले आणि स्व.आण्णांचे सुपुत्र स्व.ऍड.राजभाऊ पाटील यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कायम ठेवला.स्व.औदुंबर आण्णा हे त्यावेळी कॉगे्रसचे जिल्हाध्यक्ष पद संभाळत होते.आणि पवार साहेबंाचा शब्द मोडयचा नाही हा आण्णाचा हेका होता त्यामुळे या निवडणुकीत स्व.सुधाकरपंत परिचारक हे कॉगे्रसचे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचारार्थ आयोजीत प्रचार सभांमधून आपल्याला पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहायचे आहे,जरी कॉग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात माझा मुलगा उभा असला तरी त्याला पराभूत करुन आपल्याला स्व.सुधाकपंत परिचारक यांना विजयी करीत कॉग्रेस बळकट करायची आहे.शरद पवार यांचे हात बळकट करायचे आहेत असे आवाहन मतदारांना करीत होते.आणि राज्यात पक्षनिष्ठा आणि पवारनिष्ठेचे असे उदाहरण आजतागायत पुन्हा पहावयास मिळाले नाही.मात्र ही निवडणुक विठ्ठल कारखान्याचे समर्थक आणि आण्णा समर्थक यांनी आपल्या हाती घेतली होती आणि ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.अगदी पवार साहेंबाचे देखील.आणि इथूनच पवार साहेब आणि अण्णा समर्थक गट यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला. पुढे स्व.आण्णाच्या विरोधात बंड झाले.त्यावेळी शरद पवार हे राज्याच्या राजकारणात बलाढ्य नेतृत्व म्हणून वावरत होते.पण यात ते फारशी प्रभावी भुमिका निभाऊ शकले नाहीत.स्व.आण्णांना फुटीनंतर उरलेल्या कट्टर आण्णा समर्थकांना खरे तर हा फार मोठा धक्का होता.पुढे शरद पवार हे स्वत कॉग्रसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची त्यांनी स्थापना केली.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे वैयक्तीक जिवनातील परममित्र सुशीलकुमार शिंदे यांनी त्याची साथ सोडली,जिल्ह्याच्या ग्रामिण भागावर फार मोठे वर्चस्व असलेले मा.खा.विजयसिंह मोहीते पाटील हे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत प्रर्दीघकाळ विचारात पडले होते त्यावेळी स्व.मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी ही जबाबदारी पार पाडली आणि पंढरपूर तालुक्यातील राजकारणात परिचारक गट हा शरद पवार यांच्यासाठी प्रथम प्राधान्य ठरला.
          पुढे 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन स्व.भारत भालके यांनी शिवसेनेकडून तर पवार यांच्यावर अढळ श्रध्दा असलेल्या स्व.यशवंतभाऊ पाटील यांचे चिरंजीव स्व.राजुबापू पाटील यांनी अपक्ष निवडणुक लढविली होती तरी हे दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक यांच्यात शरद पवार यांच्याप्रती अतिशय आदराची,प्रेमाची भावनाच दिसून आली.पुढे 2006 साली स्व.आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.परिचारक यांच्या बरबरीने तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शरद पवार यांचे विचार बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.मात्र 2007 मध्ये मतदार संघ पुनर्रचनेनंतर परिचारक की भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार याची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच स्व.आमदार भालके यांनी रिडालोसमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि ते राष्ट्रवादीचे बलाढ्य उमेदवार,विजयसिंह मोहीते-पाटील यांना पराभूत करुन विजयी झाले.मात्र स्व.आ.भारत भालके हे राष्ट्रवादीच्या विरोधात लढले होते तरीही त्यांची शरद पवार यांच्यावरील श्रध्दा अढळ होती.
          2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कॉगे्रेस-आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.मात्र या निवडणुकीत स्व.आ.भारत भालकेंनी कॉग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला.आणि याच निमित्ताने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील मतदारांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला.शरद पवार यांच्या केवळ आदेशाबर हुकुम अक्कलकोट तालुक्यातील प्रा.ढोबळेसरांना आमदार करणार्‍या,सांगोला तालुक्यातील असलेल्या व मंगळवेढा तालुक्यातील जनतेला उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत नावही माहीत नसलेल्या मा.आ.राम साळे यांना मंगळवेढा तालुक्यातील जनतेने आमदार बनवले होते तर पंढरपूर तालुक्यात शरद पवार या नावाचा मोठा दबदबा होता.पण तरीही शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून दिलेले चंद्रकांत बागल यांना केवळ साडेतीन हजार मते देत शरद पवार यांना या मतदार संघातील जनतेने मोठा धक्का दिला होता.पण या निवडणुकीनंतरही स्व.आ.भारत भालके यांची शरद पवार या नावावर असलेली निष्ठा,श्रध्दा कधी कमी झाली नव्हती.
          2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडून स्व.आ.भारत भालके यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले होते.आता राज्यातील चित्र जसे पालटले आहे तसेच आ.भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील चित्रही पालटले असून आ.भालके हाच पक्ष अशी दृढ भावना असलेल्या या तालुक्यातील जनतेची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुरेपूर लक्षात आली आहे.स्व.आ.भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.यांनी आ.भालकेंच्या अंत्यसंस्कार वेळी दिलेल्या ग्वाहीमुळे पवार निष्ठ समजले जाणारे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भालके समर्थक उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शब्दाने आश्‍वस्त झाले आहेत. आता पुढील काळात या दोन्ही तालुक्याच्या राजकारणाला वळण देण्यार्‍या घडामोडीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *