गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळं 20 वर्षांच्या नातवाकडून आजीची हत्या, वडिलांनीही दिली साथ

एका नातवानं आपल्या वडिलांच्या मदतीनं आजीचा खून केला आहे. आजीनं घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळे नातवानं हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी 20 वर्षीय नातू आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य अवघ्या वीस वर्षांच्या तरूणानं केलं आहे. दुर्दैव म्हणजे, उषा गायकवाड यांच्या पोटच्या मुलानं म्हणजेच, साहिलच्या वडिलांनीही त्याला हे कृत्य करण्यास साथ दिली.

घर सोडून जाण्यास सांगितल्याच्या आणि दागिन्यांचा ताबा न दिल्याच्या रागातून 20 वर्षांच्या नातवानं वडिलांच्या मदतीनं आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातवानं अक्षरशः आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झालं आहे. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी करत हा गुन्हा उघडकीस आणला. मुंढवा पोलिसांनी नातवाला आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

उषा गायकवाड (वय 62) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर साहिल ऊर्फ गुड्डु संदीप गायकवाड (वय 20) आणि संदीप गायकवाड (वय 42) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. अवघ्या 20 वर्षांच्या साहिल यानं आजीचा खून मुंढवा येथे गळा दाबून केला. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं इलेक्ट्रिक कटरचा आधार घेतला. आजीच्या मृतदेहाचे म्हसोबा नगरच्या घरी इलेक्ट्रीक कटर आणून तब्बल 9 तुकडे केले. त्यानंतर हे सर्व तुकडे गोणीत भरुन खाडीच्या बाजूला नदीत टाकून दिले.

वीस वर्षांच्या साहिलनं 5 ॲागस्ट रोजी हा खून केला. मुसळधार पाऊस असल्यानं ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही. 10 तारखेला साहिलनंच मुंढवा पोलीस ठाण्यात आजी हरवल्याची तक्रार दिली. तसं पत्रक छापून परिसरात चिकटवलं, मात्र तपास पथकातील पोलीस संतोष जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर तपास केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मृतदेहाचा केवळ पाय नदीतून बाजूला पडलेला सुमारे 20 किमी दूर लोणी काळभोर पोलिसांना सापडला. त्याची डीएनए चाचणी केल्यावर तो पाय उषा गायकवाड यांच्या मृतदेहाच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचं कलम वाढवलं आहे. याप्रकरणी शीतल मनोज कांबळे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *