ताज्याघडामोडी

कौठाळी येथील दीडशे पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात  ‘डॉ.रोंगे सरांचे सामाजिक कार्य सर्वोत्तम’  – श्रीकांत नागटिळक

कौठाळी येथील दीडशे पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात
 ‘डॉ.रोंगे सरांचे सामाजिक कार्य सर्वोत्तम’  – श्रीकांत नागटिळक
 
 
पंढरपूर: ‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांचे शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यदेखील सर्वोत्तम आहे. त्यांनी जो ऐन गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे तो खरोखरच मोलाचा आहे.’ असे प्रतिपादन श्रीकांत नागटिळक यांनी केले.
      नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. त्यामुळे शेतीचे व पिकांचे दृष्य सध्या विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी कौठाळी (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे दीडशे पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात दिलीप भोसले यांनी डॉ.रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली व कौठाळीमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘कौठाळी मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला मागील काही दिवसापासून संयमाने व धीराने टक्कर देत जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाचे कौतुक करावेसे वाटते. कौठाळी या गावातील जागरूक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे ठरवले. आपणा सर्वांना सध्याच्या या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे. त्यामुळे आपण धीर सोडू नये. येथील अवस्था पाहून छोटीशी मदत करावीशी वाटली तरी त्याचा आपण स्विकार करावा. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी कौठाळी मधील जवळपास दिडशे पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहनराव नागटिळक, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, उद्योगपती अनिल नागटिळक, संतोष नागटिळक, आण्णासाहेब नागटिळक, अनिल नागटिळक, विकास नागटिळक, बाळासाहेब नागटिळक यांच्यासह कौठाळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *