ताज्याघडामोडी

वडार समाजासाठीचे शंभर कोटी रुपये दोन वर्षांनंतरही कागदावरच !

वडार समाजासाठीचे शंभर कोटी रुपये दोन वर्षांनंतरही कागदावरच !

वडार समाज विकास समितीच्या घोषणेनंतर कार्यवाही शून्य

बांधकाम व्यवसाय,दगड फोडणे,गाढवांद्वारे माती वाहने अशी कष्टाची कामे करून तर बहुतांश बांधकाम कामगार म्हणून काम करणारा समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडार समाजाच्या विकासासाठी शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी दोनवर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात मोठा मेळावा घेतला होता.या मेळाव्यात वडार समाजाच्या आर्थिक विकासासाठी वडार समाज विकास समिती स्थापन करीत या समितीस तात्काळ शंभर कोटी रुपये वर्ग करण्यात येत असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती.व या समितीच्या अध्यक्षपद विजय चौगुले यांना बहाल करत तीन प्रादेशिक उपाआयुक्त व एक सहाय्य्क आयुक्त याच्या माध्यमातून या वडार समाज विकास समितीचा कारभार चालेल अशी घोषणा केली होती.मात्र या घोषणेस आता जवळपास दोन वर्षाचा कालावधी होत आला असून या समितीचे पुढे काय झाले हे अजूनही गुलदस्त्यात असून जाहीर झालेले शंभर कोटी रुपयेही अजूनतरी  कागदावरच आहेत.     

           सोलापुरात मार्च २०१९ मध्ये झालेल्या वडार समाजाच्या महामेळाव्या वेळी या मेळाव्याचे संयोजक शिवसेनेचे विजय चौगुले यांनी वडार समाजास मिळालेल्या या संधीचे सोने करणार असून वडार समाज बांधव राहात असलेले शासकीय जागेवरील घरे त्यांच्या नावावर करणे,वडार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपब्लध करून देणे,वडार समाजातील विधवा व निराधार महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित करून स्वरोजगार उपलब्ध करून देणे,समाजाच्या सूचना व तक्रारी जाणून घेण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आदी घोषणा केल्या होत्या.मात्र या बाबत पुढे काय झाले याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.     

        कोरोना काळात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर बांधकाम कामगार,सेंट्रिंग कामगार,दगड फोडणे अशी कष्टाची कामे करणाऱ्यांचा भरणा सर्वाधिक असलेल्या वडार समजा बांधवांची आर्थिक कोंडी झाली असून एकीकडे पर्यावरण विभागाच्या अतिरेकी नियमावलीमुळे वाळू लिलाव बंद आहेत,आर्थिक अडचणीमुळे नव्याने सुरु होणारे बांधकामे बंद आहेत तर बांधकाम व्यवसायिक शांत आहेत.त्यामुळे वडार समाजावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.       

    पंढरी वार्ताने आठ दिवसापूर्वी वडार समाजाच्या या गंभीर प्रश्नाबाबत विजय चौगुले यांच्याशी संपर्क केला असता उद्या वडार समाजाच्या प्रश्नावर विजय चौगुले यांच्याशी संपर्क केला असता उद्या या बाबत मंत्रालयात मिटींग असल्याचे त्यांनी सांगितले होते.या मिटींग मध्ये काय निर्णय झाला या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चौगुले यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.          

    बांधकाम कामगारांना प्रतीवर्षी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ५ हजार रुपये अनुदान दिवाळी पूर्वी बँक खात्यावर वर्ग केले जाते.मात्र या वर्षी बांधकाम कामगार मंडळाकडून लॉकडाऊनच्या काळात हि रक्कम वर्ग करण्यात आले असल्याने या वर्षी बांधकाम कामगारांची दिवाळी कोरडी जाणार आहे.वास्तविक पाहता बांधकाम कामगार कल्याण मंडलाकडे ७ ह्जार कोटी रुपये पडून आहेत व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये प्रत्येकी अदा करण्यासाठी जवळपास अडीचशे कोटी रुपये लागतात व या बांधकाम कामगारांमध्ये वडार समाजबांधवाची संख्या मोठी आहे राज्यात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत व विजय चौगुले हे त्यांच्या विश्वासू शिलेदारापैकी एक समजले जातात त्या मुळे शासनाच्या वडार समाज विकास समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे नवी मूंबई येथील बलाढ्य नेते विजय चौगुले यांनी या बाबत पाठपुरावा करावा अशी अपेक्षा बांधकाम कामगारांकडून व्यक्त होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *