ताज्याघडामोडी

पंढरीत वाघबारस उत्सवाने महादेव कोळी जमातीच्या दिवाळीस प्रारंभ! वाघबारस निमित्त महर्षी वाल्मिकी संघाकडून वाघोबाचे पुजन

पंढरीत वाघबारस उत्सवाने महादेव कोळी जमातीच्या दिवाळीस प्रारंभ!
वाघबारस निमित्त महर्षी वाल्मिकी संघाकडून वाघोबाचे पुजन
पंढरपूर (प्रतिनिधी):- आज पंढरपूरमध्ये महर्षी वाल्मिकी संघघाच्या वतीने संत कैकाडी महाराज मठामध्ये वाघोबाच्या मुर्तीचे पुजन केले. वाघबारस उत्सवाने आदिवासी महादेव कोळी जमातीच्या दिवाळ सणाचा प्रारंभ झाला. हिंदू धर्मात दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी म्हटलं की गोड-धोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतिषबाजी, लक्ष्मीपूजन म्हणजे पैसा सोने- चांदीच्या दागिन्यांची पूजा आणि एक आनंदोत्सवाचा सण. परंतु हाच दिवाळीचा सण महादेव कोळी जमातीच्या समाजात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे्.निसर्गाची पूजा हा आदिवासींचा खरा धर्म. वाघदेव हे त्याचे उत्तम प्रतीक. ज्या शक्तीच्या प्रभावामुळे हिंस्त्र श्वापदांपासून त्यांचे व त्यांच्या गाई- गुरांचे संरक्षण होते ती शक्ती वाघ्यात आहे असे मानले जाते. एक महिना अगोदर आदिवासींचे सर्व देव रानात डोंगरात गेलेले असतात व ते याच दिवशी परत येतात, त्यामुळे या दिवसाला आदिवासी लोकांच्या जीवनात एक वेगळे महत्व आहे.  अनुसूचित जमातीतील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजातील बांधव दिवाळीची सुरूवातच वाघबारशीने करतात.वाघबारस अश्विन कृ. पक्षात (12) द्वादशी ला येते. वाघबारशीच्या दिवसीच  इतरांकडून  वसुबारस व गायबारस साजरी   केली जाते. जे बांधव या तिथीला काही कारणास्तव साजरी करू शकले नाहीत ते पुढील बारशीला ( शु. द्वादशीला) साजरी करतात. आज आम्हीही पंढरीत महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने वाघाचे यथोचित पुजन करुन वाघबारस साजरी केली. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. 
आदिवासी महादेव कोळी जमातीमध्ये वाघबारस दिनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज पंढरीतील महादेव कोळी जमातीच्या बंधु-भगिणींनी वाघबारस सणादिवशी वाघ्याची पुजा केली. संत कैकाडी महाराज मठामध्ये याचा प्रारंभ झाला. यावेळी गणेश अंकुशराव किशोर जाधव, राहुलदादा परचंडे, संपत सर्जे, वैभव कांबळे, रामभाऊ सुरवसे, विकी अभंगराव, सुनील म्हेत्रे, सुरज ननवरे, प्रकाश मगर, अक्षय म्हेत्रे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
वाघबारस दिनाचे महत्व :-
मराठवाड्यात बालाघाट डोंगररांगेत विविध ठिकाणी व  आदिमाता मळाई देवीच्या जवळ असलेल्या वाघदेवतेच्या मूर्तीजवळ गेल्या कित्येक वर्षापासून वाघबारस साजरी करण्यात येते. गुराखी लोक प्रत्येक घरातून वाघ्याची भायरो दुधभात खायरो ………. तांब्याला आसरा घरी दोन वासरा………… दीवाळी दसरा भाजीपाला विसरा असे गाणे म्हणून तांदूळ,दुध,थोडे पैसे याप्रमाणे निधी गोळा करतात.  वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी  नेहमीप्रमाणे गाई चारण्यासाठी जंगलात जातात या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. दुपारी या गावातील भगत व ग्रामस्थ गावाच्या बालाघाटच्या डोंगरावर वाघ देवतेच्या मूर्तीजवळ जमा होतात. पुर्वी  आदिवासी परंपरेनुसार वाघ देवतेच्या मुर्तीला दगडावर तथा चिर्‍यावर किंवा लाकडाच्या फळीवर कोरून स्थापना केलीली असायची. याला वाघदेवतेचा चिरा किंवा पाटली असे संबोधले जात असे. या वाघदेवाच्या पाटलीवर चिर्‍यावर चंद्र सूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदी चित्रे कोरलेली असायची. आत्ता बर्‍याच ठिकाणी दगडाच्या कोरीव मूर्त्या तयार करून घेतलेल्या आढळून येतात.  
  वाघ्याला या दिवशी प्रथम शेंदूर लावला जातो. शेतातील नवीन पीक आलेल्या कणसरा म्हणजे  शेंगा, भात, मका, बाजरी आदी पिकांची कणसे वाहिली जातात. गावाच्या प्रथेनुसार भगता मार्फत तांदूळ उडदाच्या पुंजा, ज्वारी व गव्हा पासून खीर ठेवून  पूजाअर्चा केली जाते. जेथे जंगलातील रान भूत रानबा गावदेवी, मरीआई,गाय या सर्वांची विधिवत पूजा केली जाते. या वाघदेवाच्या (जंगलातील वाघ) पूजेचा उद्देश एकच की आदिवासी व त्यांची गुरेढोरे कायम रानावनात जंगलात काट्या-कुट्या भटकत असतात, त्यांना या वन्यप्राण्यांपासून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, ती त्यांची भक्ष्य बनू नये, आदिवासींच्या लक्ष्मीला म्हणजेच गाई गुरांना व गुराख्यांना सुख-शांती लाभो, हा एकमेव हेतू  या वाघदेवच्या पुजेमागे आढळतो.
  वाघोबा देवा वाघोबा देवा, घोर नको लावू आमच्या जीवा.
 नको बाबा वाट धरू, नको गुरंढोरं मारू.
 आज हाय वाघबारस, फेडीतो आज तुझा नवस.
 राग रुसू नको आम्हावरी, आमची माया तुझ्यावरी. 
 येथील संपूर्ण पूजा-अर्चा आटोपल्यानंतर सर्वांना खिरीचा प्रसाद दिला जातो.   हे ठिकाण जंगलात व डोंगरावर असल्याने या उत्सवाला नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या उत्सवासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आवर्जून उपस्थित राहतात.  आजूबाजू गावातील बरेच समाज बांधव येतात.
संध्याकाळच्या सुमारास पटांगणात  (मैदानात) गावातली सर्व गुरे ढोरे एकत्र जमवतात, या ठिकाणी गावातली प्रमुख मंडळी,मुले,मुली महिला एकत्र येतात. गाईची शिंपणी करतात ( शिंपणी म्हणजे दुध,गोमुत्र, आदी वस्तू घेऊन शिंपडणे ) शिंपणी झाल्यावर  नैवेद्य ठेऊन  दर्शन घेतले जाते, मारुतीच्या, वाघ्याच्या किंवा गावदेवीच्या देवळासमोर एक शेकोटी पेटवतात. सारा जनसमुदाय तिथे लोटतो. गुराखी निरनिराळी रूपे घेतात.उदा. वाघ,अस्वल,कोल्हा इत्यादी, दुसरा गुराखी इतर रूपांना म्हणजे वाघ,अस्वल,कोल्हा यांना विचारतो  आमच्या शिवेत येशील का ?  ….. वाघाची रूपे घेतलेली गुराखी म्हणतात,  नाही नाही  म्हणतात. असे खेळ होत असतात . अशाप्रकारे वाघबारस समाज बांधव आनंदाने साजरी करतात  आणि सर्व भोजन करून घरी जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *