Uncategorized

मोहिते पाटलांचे संभाव्य बंड,उत्तम जानकर-देवेंद्र फडणवीस भेट,’समजूत काढणे’थांबल्याची चर्चा !

आणि क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत दिला गेलेला अबकी बार ४०० पारचा नारा

एक सहज विश्लेषण ! 

माढा लोकसभा मतदार संघातून भाजपकडून खासदार रणजितसिह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडूनच उमेदवारीसाठी आग्रही राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत.त्यांनी बंडाचे निशाण फडकवावे यासाठी त्यांचे समर्थक आग्रही आहेत.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी असाही आग्रह सर्मथक धरताना दिसून आले आहेत.मात्र भाजपकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही झाला.भाजपचे संकट मोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन हे अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर गेले आणि नाराजी जाणूनही घेतली.मोहिते पाटील यांची नाराजी परवडणारी नाही असे विधानही त्यांनी माध्यमांशी बोलताना केले खरे पण मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाने सोडून दिले आहेत अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.हा सारा वाद सुरु असताना माढा मतदार संघाचे प्रभारी असलेले प्रशांत परिचारक हे या वादा पासून दूर राहण्यासाठीच बाहेरगावी जाणे पसंत केले होते अशीही चर्चा झाली.मोहिते पाटील यांचा शब्द प्रमाण मानणारा मतदार पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहे हेही त्याचे कारण असावे अशीही शक्यता वर्तविली गेली.मात्र मोहिते पाटील यांचे नाराजी नाट्य जरा जास्तच लांबणीवर पडतंय आणि नाराजीच्या नावाखाली काही समर्थक तुतारीवर प्रेम व्यक्त करताना दिसून येत असल्याचा मेसेज वरिष्ठापर्यंत गेल्यामूळेच भाजपच्या वरिष्ठानी मोहिते पाटील यांची समजूत काढण्यास ब्रेक लावला अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

   आणि या मागे उत्तम जानकर यांनी सांगितलेली माळशिरस तालुक्यातील मतांची आकडेवारी हेही कारण असल्याचे मानले जात आहे.२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून भाजपला लाखाचे लीड मिळाले खरे पण पुढे सहाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विधानसभेचा उमेदवार असलेले राम सातपुते हे केवळ अडीच तीन हजार मतांनी विजयी झाले होते.आणि या वरूनच माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधक देखील तितकेच प्रबळ आहेत हेच निरीक्षण नोंदवले गेले होते.अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील हे जरी बंडाच्या पवित्र्यात असले तरी त्यांचे बंधू भाजपचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांनी आज होळीच्या शुभेच्छा देताना भाजपच्या कमळ चिन्हासहित फोटो ट्विट केला आहे.यावरूनच रणजितदादा तूर्तास तरी भाजप सोडण्याच्या तयारीत नाहीत असाही अंदाज बांधला जात आहे.मात्र आजच  माढा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी लोकसभा कोअर कमिटी व लोकसभा चुनाव प्रबंध समितीची बैठक सोमवारी मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थिती टेंभुर्णी येथे पार पडली.या बैठकीस  खासदार श्री.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे,आमदार राम सातपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, रश्मीदीदी बागल, राजकुमार पाटील, जयकुमार शिंदे तसेच माढा लोकसभा कोर कमिटी सदस्य, चुनाव प्रबंध समितीचे सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत नेऊन पक्ष वाढीसाठी आणि संघटना बळकटीकरणासाठी समर्पित भावनेने कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘अबकी बार ४०० पार’ अशा घोषणा देत सहकाऱ्यांसह विजयी निर्धार केला मात्र या बैठकीस सोमवारी  आमदार रणजितसिह मोहिते पाटील मात्र  उपस्थित नव्हते.रणजितसिह मोहिते पाटील का उपस्थित राहिले नाहीत ? याची अधिकृत माहिती मिळाली नसल्याने भाजपच्या समर्थकांत मात्र पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे.

           केंद्रात पुन्हा मोदी सरकार यावे म्हणून नाही तर अबकी बार चारसो पार चा आत्मविश्वास बाळगत भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात नाराज नेत्यांची समजूत काढत त्यांना पुन्हा आपल्या गोटात सामील करण्यात बऱ्याच ठिकाणी यशस्वी होत आहेत.अगदी दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतलेल्या,महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेची ऑफर स्वतः शरद पवार यांनी केलेली असतानाही महादेव जानकर देवेंद्र फडणवीस यांचा शब्द प्रमाण मानतात आणि देवेंद्र फडणवीस देखील महादेव जानकर यांच्या नाराजीची दखल घेतात मात्र तेच देवेंद्र फडणवीस मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी कुठलीही हालचाल करताना दिसून येत नाहीत असेच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत.आणि यातूनच आता मोहिते पाटील यांनी तुटेल इतके तरी ताणले नाही ना ? असाच प्रश्न देखील उपस्थित होत आहे.आणि उत्तम जानकर यांनी चार दिवसापूर्वी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची भेट हेच देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांची नाराजी दुर्लक्षित करण्याचे प्रबळ कारण ठरले आहे असेच समजले जात आहे.आणि मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्या वादापासून दूर राहिलेले क्लस्टर हेड प्रशांत परिचारक हेही आता माढा लोकसभेच्या माध्यमातून पुन्हा अबकी बार चारसो पारचा नारा आणखी प्रबळपणे माढा लोकसभा मतदार संघात बुलंद करण्यासाठी सज्ज झाले आहेत असेच टेंभूर्णीच्या बैठकीतून दिसून आले आहे.
      जरी काही मोहिते पाटील समर्थक तुतारी हाती घ्या म्हणून आग्रह धरीत असले तरी काही मोहिते पाटील सर्मथक हे भैयांनी नाही निदान रंजितदादांनी तरी ‘भविष्याचा वेध’ बंडाचे निशाण कुठपर्यंत फडकावत ठेवायचे याचे आत्मपरीक्षण करावे.एका खासदारकी साठी तुतारी फुंकताना आताच दमछाक होत आहे.२०१९ ची परिस्थिती आता राहिली नाही आणि जेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात अकलूजचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न राष्ठ्रवादीत असतानाच ‘धाकट्या पातीकडून’ होत होता तेव्हा थोरल्या साहेबांकडे दाद मागूनही दखल घेतली गेली नाही.आता तर वारे उलटेच वाहत आहे त्यामुळे सबुरीने घेत मोहिते पाटील यांनी निर्णय घ्यावा असवसानयात निघू लागलेला,सहकार महर्षींनी स्थापन केलेला ‘शंकर सहकारी ‘ खाईत सापडला असताना केलेली मदत.ज्यांची तुतारी फुकण्यासाठी आज उत्सुक आहोत त्यांनी उडवलेली दादांच्या कृष्णा भीमा स्थिरीकरणाची खिल्ली,आम्हाला फक्त कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या कार्यवाहीचे आश्वासन द्या म्हणून केलेला भाजप प्रवेश,जिल्हा मध्यवर्ती बँकेची सध्या कलम ८८ नुसार सुरु असलेली सुनावनी,पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात २००९ मध्ये झालेल्या दारुण पराभवा नंतर या तालुक्यात राजकीय प्रभाव वाढविण्याच्या हेतूनेच उभारला गेल्याची चर्चा करकंबच्या विजय शुगरची अवघ्या दोन तीन वर्षात झालेली ‘अवसानयात अवस्था’,ज्या माढा करमाळ्याच्या आमदार बंधूंशी राजकीय हाडवैर होते त्या त्यांच्यातील एका बंधूंच्या सहकारी साखर कारखान्याने विजय शुगर विकत घेत ‘विठ्ठलराव शिंदे युनिट क्रमांक २ केलेले नामांतर’.याच पूर्वाश्रमीच्या विजय शुगरकडे थकीत असलेली शेतकरी,तोडणी वाहतूकदार यांची बिले,ज्यांच्या विरोधात २००९ ला लढलो त्यांच्याच साखर कारखान्याने केलेली १३८ ची केस हा सारा घटनाक्रम पुन्हा एकदा डोळ्यासमोरून घातला तर हे दिवस बंडाचे नाहीत तर मागील अनुभव लक्षात घेत,स्वतःच्या चुकांचे आत्मपरीक्षण करीत ‘अबकी बार’ चा नारा देणाऱ्यांच्या गर्दीत घुसुन एकेक पाऊल पुढे टाकत नेतृत्वाची सूत्रे पुन्हा हाती कशी घेता येतील याची रणनीती आखण्याचे आहेत असेच मत काही मोहिते पाटील समर्थकच खाजगीत व्यक्त करू लागले आहेत.पण हे सारे दुर्लक्षित करून खासदारकी साठी मोहिते पाटील बंड करतात कि अजून तुटले नाही तो पर्यंत मिटवून घेतात हेच पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 
    राजकुमार शहापूरकर 
(संपादक : पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क )  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *