ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा मतदार संघात 337 मतदान केंद्रे

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

-सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर : –

252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 337 मतदान केंद्रे असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 याप्रमाणे 337 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 1 लाख 83 हजार 292 पुरुष मतदार तर 1 लाख 71 हजार 823 स्त्री मतदार व इतर मतदार 23 असे एकूण 3 लाख 55 हजार 138 मतदार आहेत. तसेच 555 सैनिक मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे व पारदर्शकपणे पार पडावी म्हणून तक्रार निवारण केंद्र, टपाली मतदान सुविधा,भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडीओ पहाणी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आली असल्याची माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगीतले.

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची तयारी या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी माहिती दिली.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी 32, भरारी पथक 4, स्थिर पथक 4, व्हिडीओ पहाणी पथक 4, व्हिडीओ सर्वेक्षण पथक 2 तसेच समन्वय अधिकारी म्हणून 40 नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेमून दिलेल्या गावामध्ये संयुक्त भेटी झालेल्या असून, त्याबाबतचे अहवाल कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तसेच यापूर्वी सर्व मतदान केंद्रांची ए. एम. एफ. सुविधा बाबतची तपासणी पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील मतदार संख्या ही 5 हजार 354 आहे. तर दिव्यांग मतदार(पी.डब्ल्युडी) 2 हजार 587 इतकी आहे. ज्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येणे शक्य नाही अशा मतदारांना होम वोटिंग सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पंढरपूर शहरात मतदान केंद्र क्र.72 गौतम विद्यालय,पंढरपूर हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर 173 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे स्ट्राॅग रुम तयार करण्यात आली आहे. तर प्रांताधिकारी कार्यालय येथे कंट्रोल रुमव्दारे पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आचारसंहितेबाबत काही तक्रारी असल्यास सी व्हिजील अ‍ॅप वापरण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आदर्श आचारसंहिता दि. 16 मार्च रोजी पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेली आहे. 42 सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक तिसर्‍या टप्प्यात असून याकामी 12 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार अहे. नामनिर्देशन 19 एप्रिल पर्यंत, मतदानाचा दि.22 रोजी अर्ज माघार घेणे व फायनल करणे तर 07 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी दि. 04 जून रोजी होणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. 06 जून आहे.

16 मार्च रोजी आदर्श आचार संहिता जाहीर झाले पासून 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व राजकीय पक्षांचे भित्तीपत्रके, घोषवाक्ये, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे तातडीने यंत्रणे मार्फत हटविण्याचे काम चालू आहे.

नियंत्रण कक्ष, आचार संहिता कक्ष, सि व्हीजिल कक्ष स्थापन करण्यात आला असून याचा संपर्क क्रमांक 02186- 299099 असा आहे. मतदार जनजागृती करिता स्वीप कार्यक्रम सुरु आहे. 16 मार्च पासून मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळणे बंद झाले आहे. मात्र नाव नोंदणी सुरु राहणार आहे. मिडिया समन्वय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कामी अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला असून प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सदरचे निवडणुकीचे संपूर्ण कामकाज सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे,अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे, मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *