ताज्याघडामोडी

वाळू माफियांची मुजोरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; डोक्यावर रॉडने जबर मारहाण

वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवारी (दि.६) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) गेले होते. त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले. यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जणांनी थेट कासार यांच्यावर हल्ला चढवला. कासार यांच्यावर डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत जखमी कासार यांची विचारपूस केली.

याप्रकारणी नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा, गौतम पानपाटील, विठ्ठल पाटील, आकाश युवराज सपकाळे, योगेश उर्फ रितीक दिगंबर कोळी, अमोल छगन कोळी, संदीप ठाकुर, शिवकुमार इंगळे, अक्षय नामदेव सपकाळे (सर्व रा. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *