ताज्याघडामोडी

कधी डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून त्याने 6 महिलांशी केलं लग्न, पण अखेर…

मोठ्या पदावर काम करत असल्याचं किंवा अधिकारी असल्याचं भासवून लग्नासाठी महिलांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडतात. ऑनलाइन पद्धतीचा यासाठी प्रामु्ख्याने वापर होतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण पोलिसांनी उजेडात आणलं असून, एका महाठगाला अटक केली आहे. ही व्यक्ती कधी न्यूरोसर्जन, डॉक्टर तर कधी पंतप्रधान कार्यालयातला अधिकारी असल्याचं भासवून महिलांची फसवणूक करत होती. काश्मीरमधल्या कुपवाडा इथल्या या व्यक्तीला ओडिशा पोलिसांनी वेश बदलून इतरांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांनी या व्यक्तीबद्दल दिलेल्या माहिती ऐकून थक्क व्हायला होईल. कधी न्यूरोसर्जन, कधी लष्करात डॉक्टर, तर कधी पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचं भासवून ही व्यक्ती इतरांची फसवणूक करत होती. आश्चर्याची बाब म्हणजे तो माणूस स्वतःला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा जवळचा सहकारी असल्याचं सांगत होता. हे सर्व समजल्यावर पोलीसही चक्रावून गेले आहेत.

इतरांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सय्यद इशान बुखारी उर्फ इशान बुखारी उर्फ डॉ. इशान बुखारी याला ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ओडिशाच्या जयपूर जिल्ह्यातल्या नेउलपूर गावातून अटक केली. एसटीएफचे महानिरीक्षक जे. एन.पंकज म्हणाले, ‘अनेक बनावट नावं धारण केलेल्या या व्यक्तीचे पाकिस्तानमधल्या अनेकांशी आणि केरळातल्या काही संशयित घटकांशी संबंध होते; पण पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिन्स अर्थात आयएसआयशी त्याचा संबंध असल्याचं आढळून आलं नाही.’

काश्मीर पोलीस बुखारीच्या शोधात होते. फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांशी त्याचा संबंध होता. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट आधीच जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंजाब, काश्मीर आणि ओडिशातली संयुक्त पथकं त्याची चौकशी करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *