ताज्याघडामोडी

फक्त शुभ मंगल सावधान म्हणण्याचं बाकी होतं, तितक्यात नवरीने केलं विष प्राशन; कारण ऐकून सगळेच रडले

लग्नाचा मंडप सजला होता, पाहुणे व मुलाकडची मंडळीही विवाहस्थळी पोहोचली होती. लग्नाआधीचे सर्व विधी झाले होते; पण फेरे होण्याआधी असं काही घडलं, की जिथे काही वेळापूर्वी पाहुण्यांची गर्दी, संगीत आणि आनंदाचं वातावरण होतं, ते सगळं दुःखात बदललं. पाहुण्यांच्या उपस्थितीत मंचावर असलेल्या वधूने वराला पुष्पहार घातला; मात्र फेऱ्यांच्या आधी वधूने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मणगड पोलीस ठाण्यांतर्गत विचगावा गावातले रहिवासी सतीश जैन यांची मुलगी सलोनी (20) हिचा विवाह बुधवारी (29 नोव्हेंबर) रंगभरी की गली इथल्या मुकेश जैन यांचा मुलगा रजत याच्याशी होणार होता. जयपूर रोडवरच्या पायल गार्डनमध्ये हा विवाहसोहळा सुरू होता. मुलीचे कुटुंबीय आणि नातेवाईक पायल गार्डनमध्ये पोहोचले आणि लग्नाच्या आधीचे सर्व विधी पूर्ण झाले. संध्याकाळी फेरे घेण्याच्या आधी वधू सलोनीने अचानक विषारी द्रव्य प्राशन केलं. तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेलं; पण प्रकृती गंभीर असल्याने तिला जयपूरला रेफर करण्यात आलं. तिला तात्काळ राजीव गांधी सामान्य रुग्णालयात नेलं गेलं; पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सध्या तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शवागारात ठेवण्यात आला. वधू या लग्नासाठी तयार नव्हती आणि तिचं गावातल्याच एका मुलावर प्रेम होतं, अशी माहिती आता समोर येत आहे.

या घटनेनंतर लग्नसमारंभात गोंधळ उडाला. वधूच्या आईची रडून रडून वाईट अवस्था झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरावली विहार पोलीस ठाण्यांतर्गत पायल गार्डन इथं लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे वधू सलोनीने अज्ञात कारणामुळे विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यानंतर तिला सोलंकी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि तिथून जयपूरला रेफर करण्यात आलं; पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढचा तपास करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *