ताज्याघडामोडी

तक्रार मागे घे, नाहीतर ते कुटुंबाला संपवतील; आधी वडिलांची हत्या, नंतर मुलाला धमकी

काही महिन्यापूर्वी संतोष सरकटे यांची हत्या झाली होती. या प्रकरणी त्यांचा मुलगा सागर सरकटे याने तक्रार नोंदवली होती. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी नितीन पाटील आणि विजय पाटील या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. गुरूवारी रात्री १० वाजता सागर हा कल्याण शीळ रोडवरून दुचाकीने जात असताना दोन अनोळखी इसम दुचाकीवर आले. त्यांनी सागर याची दुचाकी बाजूला घेतली. त्याला विनोद नितीन पाटील आणि विजय पाटील यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घे, तुला परत सांगणार नाही, ते बाहेर येतील तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारू अशी धमकी दिली.

या घटनेमुळे घाबरलेल्या सागरने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीण परिसरातील हेदूटणे गावात पाण्याच्या टँकर व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या संतोष सरकटे या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. मात्र या प्रकरणी संतोष यांची हत्या झाल्याचा संशय आल्याने मयताच्या कुटुंबाने या प्रकरणी चौकशीची मागणी केली. संतोष यांचा मुलगा सागर याने याप्रकरणी तक्रार केली होती. आधी मानपाडा पोलीस ठाणे नंतर कल्याण क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांच्या पथकाने घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करत याप्रकरणी विजय पाटील आणि नितीन पाटील या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

विजय पाटील आणि नितीन पाटील हे दोघे सध्या शिक्षा भोगत आहेत. काल रात्रीच्या सुमारास सागर आपल्या दुचाकीने कल्याण शीळ रोडहून दुचाकीने जात असताना अचानक पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले होते. त्यांनी सागरला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर सागरला शिवीगाळ करत तू नितीन पाटील आणि विजय पाटील यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, तुला परत सांगणार नाही, आज नाही तर उद्या ते बाहेर येतील तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबियांना मारून टाकतील, अशी धमकी दिली. या घटनेमुळे सागर दहशतीमध्ये आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *