ताज्याघडामोडी

मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा, तात्काळ अटक करा; गाडीच्या काचा फुटल्यानंतर गुणरत्न सदावर्ते संतापले

मराठा आरक्षणाविरोधात सातत्याने ठाम भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच हेच का तुमचे शांततापूर्ण मराठा आंदोलन, असा रोखठोक सवाल मनोज जरांगे-पाटील यांना विचारला. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. या इमारतीबाहेर असलेल्या पार्किंगमध्ये त्यांच्या दोन गाड्या उभ्या होत्या. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यामुळे यापूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, तरीही गुरुवारी सकाळी काहीजणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी गाडीच्या काचा फोडताना संबंधितांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या. अटक करण्यात आलेले तिघेही छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या सगळ्या प्रकारानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. मी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारु इच्छितो की, हीच तुमची शांततापूर्ण मराठा आंदोलनाची व्याख्या आहे का? अशाप्रकारेच हल्ले करुन मला शांत करता येणार नाही. सामान्यांच्या ५० टक्के जागांचे आरक्षण वाचवण्यासाठी माझा लढा आहे. मात्र, आज माझ्या गाडीच्या काचा फोडून माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान करण्यात आले. यापूर्वी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे घडलेल्या घटनेवेळी ३२ पोलीस कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण झाली. कारण नसताना पोलिसांवर कारवाई झाली. माझी मुलगी झेन, पत्नी जयश्री पाटील आणि मला सतत धमक्या येत आहेत. या धमक्यांमुळे गेल्या आठ दिवसांपासून माझी मुलगी झेन शाळेत गेलेली नाही. झेनला ठार मारण्याच्या, जयश्री पाटील यांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यावर अशाप्रकारचे हल्ले होतील, घात करण्याचा प्रयत्न होईल. मी सामान्यांच्या ५० टक्के जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळेच आम्हाला त्रास दिला जात आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *