ताज्याघडामोडी

बाप दारू पिऊन घरी आला; चिमुकलीला पाहताच पारा चढला, अन् केलं धक्कादायक कृत्य

ऐन गणेश उत्सवाच्या काळात वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा लागणारी घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीजवळ असलेल्या मानपाडा गावात रविवारी संध्याकाळी एका दारुड्या बापाने स्वतःच्या घरात आपल्या १० वर्षाच्या विशेष मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकारानंतर मारेकरी पिता पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी गेला आणि तेथे मुलगी मयत झाल्याची माहिती देऊन तेथून तो फरार झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुलीची आई लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरुन पती मनोज अग्रहरी (३५) या दारुड्या पित्याविरुध्द मानपाडा पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलिसांनी मध्यरात्री मनोज याला अटक केली असून अग्रहरी कुटुंब गरीब आहे. तक्रारदार लिलावती यांना चार मुली आहेत. त्यातील दुसरी मुलगी विशेष आहे. आरोपी वडील मनोज हा दारुडा असून डोंबिवलीत एका किरणा दुकानात तो कामगार म्हणून काम करत होता, असे मानपाडा पोलीस स्टेशनचे क्राईम पिआय राम चोपडे यांनी सांगितले आहे.

बाहेरून गावठी दारू पिऊन आल्यावर मनोज नेहमी पत्नी आणि मुलींसह विशेष मुलीला मारत असायचा. या मुलीचा काही उपयोग नाही. तिला मरावेच लागेल, अशी भाषा तो करत असायचा. याबद्दल पत्नीने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान विशेष मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने ती कामावरुन काही वेळासाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जात असे. रविवारी संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे यथेच्छ दारू पिऊन घरी आला. त्याने दारुच्या नशेत ओढणीच्या साह्याने मुलीचा गळा दाबून हत्या केली. मात्र शेजारच्यांना या प्रकाराची कुणकुण लागली होती.

त्यानंतर मनोज हा पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा आणि मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला. तेथून मनोजने पळ काढला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला तिच्या पतीने केलेले कूकर्म सांगितले. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी पळ काढला. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. लिलावतीने पती मनोजने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. लिलावतीने पती मनोज अग्रहरी विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *