गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आत्महत्या केल्याचा बनाव रचत मुलीचा जन्मदात्याकडून खून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मुखेड तालुक्यातील मनु तांडा येथे 2 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी या मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केले. यामुळे हा घातपात असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली. याच संशयाने पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस तपासात पित्यानेच मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी पित्याला 10 ऑगस्टला अटक केली आहे.

मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती आई-वडिलांनी ग्रामस्थांना दिली. मुलगी मानसिक दबावात होती तिने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची बतावणी आई-वडिलांकडून करण्यात आली होती. परंतु मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केल्यामुळे अनेकांना घातपाताचा संशय आला. संशयामुळे पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

मुक्रमाबाद पोलिसांना एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास करत मृत मुलीच्या वडिलांना अटक केली. त्यानंतर माध्यमांना पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती दिली. मृत मुलीचे आत्याच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते. तिने आई-वडिलांकडे लग्नाचा हट्ट धरला होता. मात्र मुलगा नशा करत असल्याने मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला. मुलीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या डोक्यातून प्रेम बाहेर पडले नाही. वारंवार समजावूनही मुलीने ऐकले नाही. याचा राग मनात धरुन वडिलांनी 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलीच्या मानेवर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर शेतात मुलीचा मृतदेह जाळला.

मृत मुलीच्या आई-वडिलांनी गावकऱ्यांना मुलीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती दिली होती. परंतु हा घातपात असल्याचा संशय असल्याने पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांनी गावातील नातेवाईकांना याचा जाब विचारला तर अनेकांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांना हत्या झाली असल्याचा संशय होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपास पथकाने मुलीचा मृतदेह जेथे जाळला होता. तेथील काही नमुने घेतले. मुलीचे हाडे प्रयोगशाळेत पाठवली. त्यानंतर मुक्रमाबाद पोलिसांनी या घटनेबाबत अनेक गोपनीय जबाब नोंदवले. गावातील काही लोकांची पुन्हा चौकशी करत जबाब नोंदवले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *