काही वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आंतरजातीय प्रेमसंबंध असल्यामुळं भावांनी बहिणीचा खून केल्याची घटना त्यामध्ये दर्शविली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलंय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सैराटसारखी धक्कादायक घटना घडलीय. प्रेम संबंध असल्याच्या आरोपातून दोन सख्या भावांनी बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केलंय. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलीय. न्यायालयानं चारही आरोपींना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी माहिती दिलीय.
भाऊ मागे लागल्यामुळं त्यांची बहिण बकऱ्यांच्या शेडमध्ये लपली होती. मात्र, भावांनी तिला शोधून ठार मारलंय. या प्रकरणी मृत महिलेच्या दोन भावांसह आई आणि वडिलांच्या विरोधात सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महिलेचे एका परजातीय व्यक्तीशी प्रेम संबंध होते. याची माहिती तिच्या दोन सख्ख्या भावांना आणि आई वडिलांनी मिळाली. या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळं मृत महिला तिच्या प्रियकरासोबत प्रियकरासोबत राक्षा शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरात राहत होती. याबाबत माहिती मिळताच तिचे दोन्ही भाऊ हातात कुऱ्हाड घेऊन निघाले. भाऊ आपल्याला मारण्यासाठी येत आहे, हे कळताच ती राहत्या घरातून पळाली. ती जवळ असलेल्या शेतात गेली. तिने तिथे असलेल्या एका व्यक्तीकडे तिने मदत मागितली. त्या व्यक्तीने तिला बकऱ्यांच्या शेडमध्ये लपायला सांगितलं. मात्र, दोघा भावांनी तिला शोधून मारहाण केली. इतकंच नाही तर हातातील कुऱ्हाड तिच्या डोक्यात घातली. आई वडिलांनी तिला जिवंत सोडू नका, असं सांगितलं होतं. त्यावेळी मृत महिलेची मदत केलेल्या व्यक्तीलादेखील त्यांनी मारहाण केली. मात्र, संधी पाहून तो तिथून पळून गेला. त्याने गुन्ह्याची माहिती पोलिसांना माहिती दिली.