ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल, थेट सिडकोला गंडा, तब्बल 60 कोटींची फसवणूक

पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जिल्हाध्यक्षाने सिडकोला 60 कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. शिरीष घरत असं या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. ते ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष अशाप्रकारे कसं कृत्य करु शकतो? अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे.

शिरीष घरत यांनी भूखंडावर हक्क सांगत सिडकोकडून भूखंड घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांनी मेट्रोच्या कामासाठी खोटा भूखंड देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे 25 गुंठे जागा विकलेली असताना त्याचा ताबा सिडकोकडे देण्यात आला. अशाप्रकारे शिरीष घरत यांनी सिडकोसह आणखी दोन कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय.

शिरीष घरत यांनी त्यांच्या मालकीची मौजे बोलपाडा (खारघर), ता. पनवेल, जि. रायगड, येथील जुना सर्वे नं. 474 गट नं.17 या भुखंडाची विक्री मे. के. एस. श्रीया इंन्फ्राबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना साठेखत आणि कुलमुखत्यारपत्रद्वारे 7 कोटी रुपयांनी विक्री केलं. त्या मोबदल्यात 1 कोटी 98 लाख रुपये स्वीकारुन, सदर भुखंड दोन्ही कंपन्यांना हस्तांतरीत केला.

शिरीष घरत यांनी त्यानंतर विकलेला भुखंड हा आपल्या मालकीचा असल्याचं भासवत सिडकोला फसवलं. त्यांनी अप्रामाणिकपणे सदर भुखंडाची ताबा पावती सिडको महामंडळला दिली. त्यानंतर आपल्या फायद्यासाठी समान क्षेत्राचा भुखंड सिडकोकडून घेतला. अशाप्रकारे शिरीष घरत यांनी दोन कंपन्या आणि सिडकोची ऐकूण 60 कोटींची फसवणूक केली, असा आरोप आहे. याच प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *