वेश्या व्यवसायाचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक मुलींना कामाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. अशीच एक घटना कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक परस्थिती कमकुवत असल्यामुळे जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्याला पुढे करून पैसे कमविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही कोपरखैरणेमध्ये राहत होती. महिलेने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीला दीड लाख रुपयांमध्ये वेश्यागमनासाठी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या महिलेला तसेच तिच्या अल्पवयीन मुलीला वेश्यागमनासाठी ग्राहक शोधून आणणाऱ्या दलालाला अटक केली आहे.
कारवाईत पोलिसांनी वेश्यागमनासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. सोनू नामक दलाल दीड लाख रुपयांच्या बदल्यात अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी ग्राहकांच्या शोधात असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक संजय जोशी, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे आणि त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून दलाल सोनू याच्यासोबत संपर्क साधला होता.
यावेळी दलाल सोनू याने अल्पवयीन मुलगी पुरविण्याची तयारी दर्शवून त्याच्या संपर्कात असलेली महिला तिच्या अल्पवयीन मुलीला दीड लाख रुपयांमध्ये ग्राहकासोबत शरीरसंबंधासाठी पाठविण्यास तयार असल्याचे सांगितले. बनावट ग्राहकाने त्यास होकार दिल्यानंतर दलाल शहरोज अली उर्फ सोनू इर्शादअली सय्यद वय (३१) याने सायंकाळी ७ वाजता महापे एमआयडीसीतील सुयोग हॉटेल समोरील बस स्टॉपजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी महापे एमआयडीसीतील सुयोग हॉटेलसमोर सापळा लावला होता.