गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप महिला पदाधिकारी हत्याकांडात नवनवे धागेदोरे; फेसबुकवर ओळख, प्रेम फुललं आणि नंतर…

भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान यांची फेसबुकवर अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासोबत ओळख झाली. दोघांची पहिली प्रत्यक्ष भेट ही रेल्वेत झाली. फेसबुकवरील प्रेम आत्मघाती ठरणार, अशी कल्पनाही सना यांना नव्हती. यातच त्यांचा घात झाला, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे.

सना खान हत्याकांड प्रकरणात अमित ऊर्फ पप्पू शाहू (वय ३५, रा. राजुल टाउनशिप, गोराबाजार, जबलपूर) व त्याचा मित्र राजेश सिंग हे दोघे १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी जितेंद्र गौड सध्या कारागृहात आहे. कोठडीदरम्यान पोलिस पप्पूची कसून चौकशी करीत असून, काही प्रश्नांची उत्तरे तो देत आहे. तर काही प्रश्नांवर मौन बाळगत आहे.

लॉकडाउन सुरू असताना सना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांची पप्पूसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली. दोघेही चॅट करायला लागले. यादरम्यान दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेतले. त्यानंतर दोघे व्हॉट्सअॅपवर चॅट करायला लागले. मे २०२१मध्ये सना या वाराणसीहून रेल्वेने नागपूरला परत येत होत्या. रेल्वे प्रवासात दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. प्रवासादरम्यान पप्पूने सना यांना बिर्याणी दिली. त्यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. कधी पप्पू नागपुरात तर कधी सना या जबलपूरला जाऊन पप्पूला भेटायच्या. दोघांनी भागीदारीत आशीर्वाद ढाबा उघडला. सना यांनी त्याला पाच लाखांची रोख व दोन लाख रुपये किमतीचे दागिने दिले. व्यावसायिक भागीदार असतानाच पप्पू व सना यांनी एप्रिल महिन्यात लग्न केले. लग्नानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले.

गेल्या दोन महिन्यांपासून पप्पूने मिळकतीतील नफाही सना यांना देणे बंद केले. १ ऑगस्टला पप्पूने सना यांना व्हिडिओ कॉल केला. यावेळी सना यांनी भेट दिलेली सोनसाखळी पप्पूच्या गळ्यात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पप्पूला विचारणा केली. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तडकाफडकी त्याचदिवशी रात्री सना या जबलपूरला जायला निघाल्या. २ ऑगस्टला सकाळी पप्पूने त्यांची काठीने वार करून हत्या केली. राजेशच्या मदतीने मृतदेह हिरण नदीत फेकला. दरम्यान, पोलिस नदीत मृतदेहाचा शोध घेत असून रविवारीही पोलिसांना तो आढळून आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *