ताज्याघडामोडी

महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं

उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली. त्यात लाठ्या-काठ्यांनी जोरदार मारामारी होऊन मृतक जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुनील घनश्याम सुंदरकर (३५) असे गावातील महिलांना त्रास देणाऱ्या मृत गावगुंडाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आनंद नामदेव पाटील (२०) आणि प्रज्वल नरेश मोरे (२५) यांना अटक केली आहे. या दोघांपैकी १७ वर्षीय तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतकासह तिन्ही आरोपी भिवापूर येथील रहिवासी आहेत. सुनीलला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी दारूच्या नशेत भांडण, महिलांची छेडछाड, तरुणांना शिवीगाळ आणि मारहाण करत असे. यामुळे नागरिक त्रस्त होते. सुनील रोज कोणाच्या तरी घराची तोडफोड करायचा. शुक्रवारी सकाळी सुनीलने नशेच्या अवस्थेत शोभा नामदेव पाटील यांच्या घरात घुसून वस्तू फेकण्यास सुरुवात केली. महिलेने आवाज वाढवताच तो पळून गेला. नरेश मोरे यांच्या घराची तोडफोड करू लागला.

यानंतर आनंद, प्रज्वल आणि त्यांच्या मित्राने सुनीलला रोखण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना सुनीलने तिन्ही मुलांवर हल्ला केला. त्यानंतर तिन्ही तरुणांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. पोलीस आल्यानंतर जखमी गावगुंड सुनीलला उपचारासाठी नागपूरला नेले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३४ आणि इतर गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली असून एकालाच ताब्यात घेण्यात आले आहे. बेला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून काही साहित्य जप्त केले. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट दिली. सुनील सुंदरकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. २०१४ मध्ये त्यानी तत्कालीन सरपंच सविता नाथू मून यांच्यावर विनाकारण कुऱ्हाडीने वार केले होते. यामध्ये सविता गंभीर जखमी झाली. याप्रकरणी बेला पोलिसांनी सुनीलविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *