सध्या टोमॅटोला सोन्यासारखे भाव आले आहेत. टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्यांच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. मात्र, शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० क्रेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अरुण बाळू ढोमे असे टोमॅटो चोरी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून आजच्या बाजारभावानुसार अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
यावेळी ढोमे यांनी सांगितले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून ढोमे यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. सध्या टोमॅटो पिकाची तोडणी करून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास योग्य निवड करून टोमॅटो क्रेट आपल्या वाहनातून घराजवळ आणून उभे केले होते. मात्र, काल बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी आणि क्रेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले.
मात्र, सकाळी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले क्रेट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने टोमॅटोची क्रेटसह चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे यांना घटनेची माहिती देत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दाखल केली असून या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.