गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी एकत्र दारू प्यायले,वाद होताच दोन सख्ख्या भावांचा काढला काटा

शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून सरलांबे गावातून एका हल्लेखोराला शहापुर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ अधिकारी असे दुहेरी हत्याकांडात अटक आरोपीचे नाव आहे. तर योगेश धर्माधिकारी (३०) आणि पुंडलिक धर्माधिकारी (३५) असे निर्घृण हत्या झालेल्या दोन्ही सख्या भावांची नावे आहेत. मृतक योगेश धर्माधिकारी आणि पुंडलिक धर्माधिकारी हे दोघे भाऊ ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात कुटुंबासह राहत होते. त्यातच रविवारी रात्रीच्या सुमारास मृत दोघे भाऊ आणि आरोपी सोमनाथ अधिकारी हे तिघे आरोपी सोमनाथच्या शेतातील घरात दारू पीत बसले होते. दारूच्या नशेत असतानाच पूर्वीच्या शेतजमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता.

त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. आरोपी सोमनाथ याने या दोघा भावांच्या डोक्यात आणि मानेवर धार धार शस्त्राचे घाव घालून त्यांना जागीच ठार केले. त्यांची निर्घृण हत्या करून घटनस्थळावरून पळ काढला होता. दरम्यान आज सकाळच्या सुमारास घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघा भावांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणी मृतक भावांचे वडील धर्माधिकारी यांनी शहापुर पोलिसांत आज (सोमवारी) गुन्हा दाखल केला.

आरोपींचा शोध सुरू केला असता काही तासांतच आरोपी सोमनाथ अधिकारी याला पोलीस पथकाकडून सरलांबे गावातून अटक करण्यात आली आहे. आता पोलीस आरोपी सोमनाथसोबत आणखी कोणाचा गुन्ह्यात सहभाग आहे का या दिशेने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली आहे. तसेच जमिनीच्या वादातूनच दुहेरी हत्याकांड झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *