बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट कायम आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ 65 किमी वेगाने जोधपूरच्या दिशेने सरकत आहे.या वादळामुळे सर्व संरक्षण आणि बचाव यंत्रणा सतर्क आहेत, तर भारतीय हवामान विभागाकडून हे वादळ लवकरच शांत होईल, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 23 जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दक्षिण आणि ईशान्य भारतात 18 ते 21 जून दरम्यान पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आधीच लांबणीवर गेलेला पाऊस चक्रीवादळामुळे आता आणखी रखडण्याची चिन्हं दिसून येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.